Belgaum : रुग्णालयातच मिळणार जन्म, मृत्यू दाखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum

Belgaum : रुग्णालयातच मिळणार जन्म, मृत्यू दाखले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शहरातील रुग्णालयांमध्येच जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना महानगरपालिकेकडून राबविली जाणार आहे. नव्या वर्षात ही योजना सुरू केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. शहरातील ५० हून अधिक रुग्णालयांमध्ये जन्म व मृत्यूची ऑनलाईन नोंदणीची सुविधा महापालिकेने आधीच उपलब्ध करून दिली आहे. नव्या वर्षात दाखलेही रुग्णालयामधूनच दिले जातील. त्यासाठी महापालिकेकडून लवकरच रुग्णालय व्यवस्थापनाची बैठक घेतली जाणार आहे.

दोन महिन्यांपासून सेवा सिंधू सुविधेच्या माध्यमातून जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध करून दिले जात आहेत. घरबसल्या किंवा सेवा सिंधू केंद्रात जाऊन दाखले घेण्याचे आवाहन महापालिकेकडून सातत्याने केले जात आहे, पण महापालिकेत जाऊन दाखले मागणाऱ्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. त्यावर उपाय म्हणून ज्या रुग्णालयांमध्ये बाळाचा जन्म होईल, त्याच रुग्णालयामध्ये जन्म दाखला उपलब्ध करून दिला जाईल, तर रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृत्यू दाखलाही संबंधित रुग्णालयच देईल. जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्डवरील माहितीच्या आधारे जन्म किंवा मृत्यूची ऑनलाईन नोंदणी होईल. ती माहिती महापालिकेला मिळाल्यानंतर ‘ई-जन्म’ पोर्टलच्या माध्यमातून त्याला मंजुरी दिली जाईल. महापालिकेच्या मंजुरीनंतर रुग्णालयामध्ये दाखले दिले जातील. यासाठी सेवा सिंधू सुविधेचा वापर करता येईल. घरीच जन्म किंवा मृत्यू झाला असेल, तर मात्र त्याची रीतसर महापालिकेकडे नोंद करावी लागेल. महापालिकेकडून नोंदणी झाल्यावर तेथील जन्म, मृत्यू नोंद विभागाकडून किंवा सेवा सिंधू केंद्रातून दाखला मिळेल.

दोन महिन्यांपूर्वीपर्यंत दाखले केवळ महापालिका कार्यालयातच दिले जात होते. जन्म व मृत्यू नोंदही महापालिकेतच केली जात होती. २०२० साली महापालिकेने शहरातील काही रुग्णालयांमध्ये जन्म व मृत्यूची थेट ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर सेवा सिंधू सुविधा उपलब्ध करून दिली. रुग्णालयामध्ये दाखले उपलब्ध करून देण्याच्या योजनेला प्रतिसाद मिळेल, असे पालिका प्रशासनाला वाटते.

"थेट रुग्णालयामध्येच जन्म व मृत्यू दाखले देण्याची योजना नव्या वर्षात सुरू केली जाणार आहे. यासाठी रुग्णालय व्यवस्थापनासोबत चर्चा केली जाईल. यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे."

-डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी

loading image
go to top