बेळगाव : गुन्हेगारीचा आलेख वाढतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

बेळगाव : गुन्हेगारीचा आलेख वाढतोय

बेळगाव : गरिबांचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या बेळगावात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. सहा महिन्यांत तब्बल १२ खून प्रकरणे घडली आहेत. अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार, मालमत्ता तसेच इतर क्षुल्लक कारणांमुळे एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत आहेत. सातत्याने घडणाऱ्या खुनांच्या मालिकांमुळे बेळगाव हादरून गेले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस खात्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगावकर नागरिकांतून केली जात आहे.

क्षुल्लक कारण पुरेसे

शांततापूर्ण बेळगावची ओळख आता गुन्हेगारीकडे वळू लागली आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या बेळगावात यापूर्वीही अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना घडल्या. मात्र, अलीकडच्या काळात घडणाऱ्या खुनाच्या मालिका सुन्न करून सोडणाऱ्या आहेत. क्षुल्लक कारणावरूनही एकमेकांचे मुडदे पाडले जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे समाजात जागृती करण्यासाठी पोलिसांबरोबरच समाजिक संस्थांनीही आता पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

सहा महिन्यांतील घटना

मोबाईल खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये दिले नसल्यामुळे २ जानेवारी रोजी बसलिंगव्वा अदृश्य यम्मीनकट्टी (वय २९) या महिलेचा दीरानेच मोबाईल चार्जरने गळा आवळून खून केला होता. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ जानेवारीला गांधीनगरजवळील मुचंडी गॅरेजनजीक नोहान नासीर धारवाडकर (वय २३, रा. रुक्मिणीनगर) या रिक्षाचालकाचा त्याच्या मित्रांनीच खून केला. तसेच मृतदेहही फेकून दिला. ३० जानेवारी रोजी कोंडस्कोप येथील हनुमंतवारी परिसरात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी युवकाची मानवी कवटी व हाडे आढळून आली आहेत.

अनैतिक संबंध व पैशांच्या व्यवहारातून २७ फेब्रुवारीला बेळगुंदी रियल इस्टेट व्यावसायिक गजानन बाळाराम नाईक (वय ५२) याचा खून करण्यात आला. माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेणुकानगर येथे २ मार्चला अनैतिक संबंधातून संतोष नारायण परीट (वय ३६, रा. चंदगड, जि. कोल्हापूर) या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आला. त्यानंतर गवतगंजीत घालून त्याला पेटवण्यात आले होते.

१५ मार्च रोजी रियल इस्टेट व्यावसायिक राजू मल्लाप्पा डोड्डबोम्मण्णावर यांचा सकाळच्यावेळी डोळ्यात मिरची पूड टाकून भवानीनगर येथे सुपारी घेऊन खून करण्यात आला. कौटुंबिक वादातून २५ मार्चला किल्ला तलावाजवळ भररस्त्यात हिनाकौसर मंजुरइलाही नदाफ (वय २९) या महिलेचा तिच्या पतीनेच खून केला. ३१ मार्चला करडीगुद्दी येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर झालेल्या तलवार हल्ल्यात मुदकाप्पा चंद्रप्पा अंगडी (वय २५, रा. सनकुप्पी, ता. बैलहोंगल) या तरुणाचा खून करण्यात आला. २ एप्रिलला रात्री रणकुंडये येथे घरात घुसून टोळक्याने नागेंद्र भाऊसाहेब पाटील (वय ३२) याचा खून केला. बहाद्दरवाडी येथून अपहरण करण्यात आलेल्या देवाप्पा सुरेश सुतार (वय १७) या युवकाचा खून झाल्याचे २६ मे रोजी उघडकीस आले होते. १८ जूनला गौंडवाडला सतीश पाटील तर मजगाव येथे यल्लेशप्पा कोलकार (वय ३७) या तरुणाचा २९ जूनला रात्री खून करण्यात आला.

शहर-उपनगर आणि ग्रामीण भागात खुनाच्या घटनांत वाढ झाली आहे. तरीही खून प्रकरणांचा छडा लावण्यात यश येत आहे. अनैतिक संबंध, आर्थिक देवाण-घेवाण आणि क्षुल्लक कारणावरून या खुनाच्या घटना घडत आहेत.

- रवींद्र गडादी, पोलिस उपायुक्त

Web Title: Belgaum Crime Case Study The Rise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..