esakal | Belgaum Election Result 2021 - कोण मारणार बाजी? आज फैसला
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Election Result 2021 - कोण मारणार बाजी? आज फैसला

पहिल्यांदा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला.

Belgaum Election Result 2021 - कोण मारणार बाजी? आज फैसला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राजकीय पटलावर दीर्घकाळ परिणाम करणारा येथील महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Belgaum Election 2021) निवडणुकीत कमी मतदान झाल्याने उत्सुकता कमालीची ताणली गेली असून, ५८ प्रभागांतील ३८५ उमेदवारांपैकी कोणाला मतदारांनी आपला कारभारी म्हणून निवडला आहे, यावर शिक्कामोर्तब होईल. (Belgaum Update) आखाड्यातील उमेदवारांसह समर्थकांची धाकधूक वाढली असून, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, वा सत्तेच्या जादुई आकड्यापर्यंत पोचण्यासाठी जनतेने कोणाला कौल दिला आहे, या साऱ्या एक आठवड्यापासून ताणल्या गेलेल्या प्रश्‍नांची उकल होईल. (Belgaum Election Result 2021)

या वेळी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आप, एआयएमआयएम, शिवसेनेसह महाराष्ट्र एकीकरण समिती महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी सर्वांनी जंग जंग पछाडले. पहिल्यांदा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला. दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरविले. महापालिका काबीज करण्याच्या घोषणा दिल्या. आता त्याला प्रत्यक्षात मतदारांनी कितपत प्रतिसाद दिला, याची उत्तरे उद्या दुपारपर्यंत मिळणार आहेत.

हेही वाचा: पंजशीर तालिबान जिंकणार, अहमद मसूदकडून युद्ध थांबवण्याची मागणी

दोन वर्षांपासून अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनामुळे ओढविलेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन निवडणूक विभागाने कोविड नियम पाळत निवडणूक घोषित केली. अपवादात्मक काही ठिकाणी फज्जा उडाला असला, तरी सगळीकडे सुरळीत निवडणूक पार पडली. पण, आता मतमोजणी व्यवस्थित पार पाडण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ‘बी. के. मॉडेल’मध्ये चालणाऱ्या मतमोजणीची पूर्वतयारी झाली. दुपारी बारा ते एकच्या सुमारास मतदारांचा कौल कळणार आहे.

मतमोजणी केंद्राच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला. दुकाने व हॉटेल्स बंद ठेवली जाणार असून, वाहने लावण्यास वा गर्दी करण्यासाठीही निर्बंध आहेत. प्रभागनिहाय आसन व्यवस्था करण्यात आली. कोणत्या प्रभागाची मतमोजणी आहे, त्या प्रभागातील उमेदवार, एजंट व मतमोजणी एजंटांना आत प्रवेश मिळेल. तळ मजल्यावर माध्यम प्रतिनिधींचा कक्ष असेल. विजयी उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले जाईल.

हेही वाचा: महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपचे पॉलिटिकल एजंट - संजय राऊत

अशी होईल मतमोजणी

 • निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी -१२/१२

 • मतमोजणी कक्ष- १२ (प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यासाठी एक खोली)

 • मतमोजणी टेबल- प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याकडे २ इव्हीएम, १ पोस्टल मतदान

 • मतमोजणी पर्यवेक्षक- प्रत्येक खोलीसाठी ३

 • मतमोजणी सहायक- प्रत्येक मतमोजणी खोलीसाठी ६

 • इव्हीएम सुरक्षा अधिकारी- प्रत्येक खोलीसाठी १ अभियंता

 • निवडणूक अधिकाऱ्यांसाठी वेळ- सकाळी ७.३० ला सर्व मतमोजणी खोलीत हवेत

 • मतमोजणी- सकाळी ८ पासून सुरू

एक दृष्टिक्षेप

 • एकूण प्रभाग ः ५८

 • मतदान केंद्रे ः ४१५

 • उमेदवार ः ३८५

 • मतमोजणी एजंट ः २ अनुमती

loading image
go to top