ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Electricity News

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वीज दरवाढ होणार नाही, अशी अपेक्षा ग्राहकांतून व्यक्त केली जात होती. मात्र विजेच्या दरात एक एप्रिलपासून वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे.

Electricity rate : ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक

बेळगाव - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वीज दरवाढ होणार नाही, अशी अपेक्षा ग्राहकांतून व्यक्त केली जात होती. मात्र विजेच्या दरात एक एप्रिलपासून वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे.

आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण देत हेस्कॉम, बेस्कॉम आदी वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवून देण्याची मागणी केली होती. प्रतियुनिट वाढवल्या जाणाऱ्या दराबाबत ग्राहकांकडून आक्षेप मागविले होते. आक्षेप नोंदविल्यानंतर काही दिवसांपूर्वी हुबळी येथे बैठकीचे आयोजन केले होते. मात्र वीज कंपन्यांनी केलेल्या मागणीनुसार केईआरसीने सुधारित वीज दर लागू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

केईआरसीने दरवाढ करण्यास परवानगी दिल्यामुळे १ एप्रिलपासून नवीन दर लागू केले जाणार आहेत. प्रतियुनिट एक ते दीड रुपयांपर्यंत दर वाढवून द्यावा, अशी मागणी हेस्कॉमसह इतर कंपन्यांनी केईआरसीकडे केली होती. मात्र दर किती प्रमाणात वाढविणार आहे, याची अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र आठ दिवसात सुधारित दर जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती दिली आहे. वीज कंपन्यांकडून दरवर्षी वीज दरवाढ केली जात असल्याने ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

दरवर्षी ६० ते ७० पैशांची प्रतियुनिट मागे दरवाढ होत असल्याने वीज बिल अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे नागरिकांना वाढीव बिल भरतानाही अडचण निर्माण होत आहे. दखल घेऊन दरवाढ अधिक प्रमाणात होणार नाही याची दखल सरकारने घेणे गरजेचे असल्याचे मत ग्राहकांमधून व्यक्त होत होते.

ग्राहकांत नाराजी

एप्रिलपासून दर वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आणि दरवाढ याचा कोणताही संबंध नसल्याचे दिसून आले आहे. मात्र दरवर्षी वीज दरवाढ होत असल्याने ग्राहकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.