esakal | शेतकरी महिला बनली 'आदर्श माता'
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

Belgaum : शेतकरी महिला बनली 'आदर्श माता'

sakal_logo
By
गजानन पाटील

बेडकिहाळ : जीवन म्हणजे एक आव्हान असून त्यास प्रत्येकाला सामोरे जावे लागते. पण काही मंडळी खडतर परिस्थितीच्या वादळातही जिद्द व परिश्रमाच्या जोरावर दिवा लावतात. येथील सुलोचना दत्तात्रय साळुंखे या नवदुर्गेचा प्रवास असाच आहे. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी चार मुलींचा सांभाळ केला. तसेच मुलग्यास लष्करात भरती करण्याची जिद्द पूर्ण करून सर्वसामान्य महिलांसमोर आपला आदर्श ठेवला आहे. आदर्श माता पुरस्कारांच्या रूपाने त्याची पोहोचही त्यांना मिळाली आहे.

बेडकिहाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जिद्दी व कर्तृत्ववान महिला सुलोचना यांचे भीमापूरवाडी हे माहेर. त्यांचे शिक्षण केवळ ७ पर्यंतच झाले. पुढील शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असतानाही त्यांचे लग्न बेडकिहाळ येथील दत्तात्रय साळुंखे यांच्याशी झाले. सहा जणांचे शेतकरी कुटूंब असल्याने सुलोचना यांना घरकामाबरोबर शेतातील कामेही करावी लागत. पती दत्तात्रय हे गावातील एका दूध संघात अल्पशा पगारावर काम करत. त्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. औषधोपचारासाठी बराच पैसा खर्चूनही उपयोग झाला नाही. या काळात सुलोचना यांच्यावरच घरासह शेतीची जबाबदारी पडली. काही वर्षे गेल्यानंतर पतीचे हृदयविकाराने निधन झाले.

सुखाचा संसार चालला असताना सुलोचना यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. पदरात चार मुली व एक लहान मुलगा असल्याने जगणेच कठीण झाले. मात्र शिक्षणाचे महत्व जाणलेल्या सुलोचना यांनी चारही मुलींना १२ वी पर्यंत शिक्षण दिले. त्यानंतर योग्य स्थळे आल्यावर त्यांचा विवाह देखील केला. या काळात भाऊ रवींद्र जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अनेक संकटे आली तरी त्या खंबीर राहिल्या. घरच्या दीड एकर शेतीसह दोन म्हशींचा सांभाळ करून घराला सावरले.

सुलोचना यांनी घालून दिलेला आदर्श व जिद्द कार्य पाहून त्यांना २०२१ साली बेडकिहाळ येथील जिजामाता महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापिका सुप्रिया पाटील मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच बोरगल गणेश युवक मंडळाच्या वतीनेही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

हेही वाचा: Kolhapur : लसीकरणात ३१४ गावांची आघाडी

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

मुलगा सचिन यास उच्चशिक्षण देऊन सरकारी नोकरी लावण्याची जिद्द बाळगली. सचिनने बी. कॉम. पदवी घेतली. या पदवीच्या शेवटच्या वर्षीच तो लष्करात भरती झाल्याने सुलोचना यांना कष्टाचे उदात्त फळ मिळाले. हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला, असे सुलोचना साळुंखे म्हणाल्या.

जीवन म्हणजे उन्ह, सावलीचा एक खेळ आहे, सुख-दुःखाचे क्षण येतात आणि निघूनही जातात. पण येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जात आत्मविश्वास ढळू न देता वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. त्यामुळे महिलांनी न भिता खडतर परिस्थितीचा सामना करावा.

-सुलोचना साळुंखे,

बेडकिहाळ

loading image
go to top