esakal | Kolhapur : लसीकरणात ३१४ गावांची आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

Kolhapur : लसीकरणात ३१४ गावांची आघाडी

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात कोरोना लसीकरण धडाक्यात सुरु असले तरी लोकांचा मात्र हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र यातही १०२५ पैकी ३१४ गावांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करून आघाडी घेतली आहे. आता आव्‍हान आहे ते १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणाचे. यातही ८० टक्‍के लसीकरण झाले आहे; मात्र २० टक्‍के लोकांचे लसीकरण बाकी असल्याने तिसऱ्या लाटेचा व या लाटेतही मुलांना कोरोनाचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करण्यासाठी संबंधित कुटुंबीय व ग्रामपंचायतीने ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.

कोरोनाची लाट थोपवायची असेल तर सुमारे ३० लाख १४ हजार ४०० लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत यातील २४ लाख ४५ हजार ४९१ लोकांना पहिला डोस घेतला आहे. ९ लाख ९० हजार ४७९ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. अजूनही किमान ५ लाख ५० हजार लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित लोकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरण होत नसल्याने आरोग्य विभागासह प्रशासनही हतबल झाले आहे. ग्रामदक्षता समित्या, आरोग्य समित्या, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी व संबंधित कुटुंबातील लोकांकडून लसीकरणाचा उठाव होत नाही, तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचा निष्‍कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

तालुका शंभर टक्‍के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायती

 1. आजरा - ४३

 2. भुदरगड - १७

 3. चंदगड - ८७

 4. गडहिंग्‍लज - २६

 5. गगनबावडा - ११

 6. हातकणंगले -१८

 7. कागल - ७

 8. करवीर - २१

 9. पन्‍हाळा - २०

 10. राधानगरी - २२

 11. शाहूवाडी - ४१

 12. शिरोळ - १

एकूण ३१४

हेही वाचा: Maratha Reservation - 'कोरोनाच्या नावाखाली केवळ चालढकल'

''सध्या १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची व्यवस्‍था केली आहे. मात्र १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. ही मुलं लसीकरण न झालेल्यांच्या संपर्कात येणार आहेत. त्यामुळे या मुलांना धोका जास्‍त असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. या मुलांना कोरोनातून वाचवायचे असेल तर १८ वर्षांवरील ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.''

- डॉ. फारुख देसाई, लसीकरण विभाग प्रमुख

कोरोनाचे रुग्‍ण कमी होत असल्याने तिसरी लाट येणार की नाही, याची चर्चा सुरू आहे. मात्र पुणे, नगर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्‍ह्यात रुग्‍णसंख्या वाढत आहे. काही ठिकाणी शाळांना पुन्‍हा सुट्टी दिली जात आहे. यातील पुणे, सिंधुदुर्ग व सातारा जिल्‍ह्याचा कोल्‍हापूरशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोल्‍हापुरातदेखील तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

loading image
go to top