
बेळगाव : वळवाच्या पावसाने झोडपले
बेळगाव : विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह शहर आणि परिसराला शनिवारी (ता. ९) वळवाच्या पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यांमुळे शहराच्या अनेक भागांत झाडे व फांद्या तुटून पडल्या. तसेच, घराची व काही ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमांची छतेही कोसळली. काही ठिकाणी विजेचे खांबांचे नुकसान झाले. यामुळे दुपारी काही वेळ वीजपुरवठा बंद ठेवला.
गेल्या काही दिवसांपासून वळवाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अधूनमधून सरी बरसत आहेत. दोन दिवसांपासून दुपारच्या वेळीच जोरदार पाऊस होत आहे. शनिवारीही झालेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठे नुकसान झाले. विजा व जोरदार वाऱ्यामुळे झालेल्या या पावसामुळे रहिवाशांचीही तारांबळ उडाली. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच, काही ठिकाणी गटारीही भरल्या होत्या. काही ठिकाणी गटारीतील कचरा रस्त्यावर आला होता. गोवावेस, टिळकवाडी, बोगारवेस, चन्नमा सर्कल आदी ठिकाणी पाणी तुंबले. या पावसाच्या पाण्यातून वाट काढणेही अवघड बनले होते.
ज्या ठिकाणी वीज तारा कोसळल्या. त्या ठिकाणी ‘हेस्कॉम’चे कर्मचारी तातडीने दाखल झाले. त्यांच्याकडून दुरुस्तीचे कामही हाती घेतले जात होते. तसेच, वन विभाग कर्मचाऱ्यांकडूनही रस्त्यावरील झाडे बाहेर काढण्याचे काम सुरू होते. जोरदार पावसामुळे भाजीपाला विक्रेत्यांनाही फटका बसला. त्यांना व्यापारी आस्थापनांचा आसरा घ्यावा लागला. दुपारी तासभर पडलेल्या पावसामुळे बाजारातील गर्दीही कमी झाली होती. त्यानंतर पुन्हा बाजारपेठेत वर्दळ वाढली.गणेशपूर रोडवरील गुड शेफर्ड शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘डॉग शो’निमित्त उभारलेला पेंडॉल वाऱ्यामुळे कोसळला. यामुळे आयोजकांना नाहक फटका बसला. दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
याचबरोबर शहरात काही ठिकाणी दुकानांचे व नेत्यांचे फलक कोसळले. हिंडलगा भागात जोरदार पाऊस झाला. निसर्ग कॉलनीत झाडांच्या फांद्या तसेच वीज खांब कोसळले. धामणे येथे मुख्य रस्त्यावर झाडांच्या फांद्या वीज खांबावर पडल्या. यामुळे ‘हेस्कॉम’चे नुकसान झाले. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. हलगा-तारीहाळ रोडवर चार झाडे व चार विद्युत खांब कोसळले होते. यामुळे रस्ता बंद झाला होता. नागरिकांनी झाडांच्या फांद्या हटविल्या.
Web Title: Belgaum Heavy Rains Lashed Damage Crop
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..