esakal | बेळगाव रुग्णालयात टोलवाटोलवी; रुग्णांची होतेय हेळसांड

बोलून बातमी शोधा

बेळगाव रुग्णालयात टोलवाटोलवी; रुग्णांची होतेय  हेळसांड
बेळगाव रुग्णालयात टोलवाटोलवी; रुग्णांची होतेय हेळसांड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रामलिंगखिंड गल्लीतील एका रुग्णावर उपचार न करताच त्याला घरी पाठविण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात शनिवारी घडला. त्यामुळे कोरोनाचे कारण देत रुग्णांची हेळसांड करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शशिकांत करंबेळकर वय 79 हे गेल्या चार दिवसांपासून आजारी आहेत. मात्र त्यांच्या घरी ते व त्यांचे भाऊ दोघेच राहतात तशीच त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. त्यामुळे त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार होऊ शकले नाहीत याची माहिती मिळताच माजी महापौर सरिता पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक असल्याचे समजताच त्यांनी हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांना माहिती दिली.

त्यानंतर त्यांना रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरिता पाटील व इतर लोक घरी परत आले.

मात्र कोरोनाचे रुग्ण आहेत त्यामुळे जिल्हा रुग्णालयात जागा नाही त्यामुळे खाजगी दवाखान्यात दाखल करा असे सांगत शशिकांत याना परत रुग्णवाहिकेतून परत पाठविण्यात आले याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्याधिकारी संजय डुमगोळ यांच्याशी संपर्क साधून याबाबत जाब विचारला त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीही कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना परत पाठवले जात आहे. त्यामुळे अनेक रुग्णांची हेळसांड झाली होती त्याच प्रकारे पुन्हा कोरोनाची भीती दाखवित रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला जात आहे. याची दखल घेत संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Edited By- Archana Banage