'व्हॅलेंटाईन डे' च्या पूर्वसंध्येला पतीकडून पत्नीचा खून..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुलीला शाळेतून आणण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर दोघांचे भांडण विकोपाला गेले. आणि....

 बेळगाव : पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. कविता परशुराम पिसे (वय ३०, मूळ रा. गुलबर्गा, सध्या रा. विजयनगर, बेळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. संशयित परशराम पिसे हा एक राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे.

परशराम आणि कविता यांचे लग्न होऊन आठ वर्षे झाली. परशराम हा विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील असून नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब विजयनगर येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहते. त्यांना सहा वर्षाची आणि सहा महिन्याची मुलगी आहे .

हेही वाचा - Valentine Day Special ; सलाम तिच्या धाडसी निर्णयाला; कर्करोगग्रस्त प्रथमेशसोबत केला विवाह

रागाच्या भरात पतीने केले हे कृत्य

गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास पत्नीने परशरामला बँकेतून घरी बोलावून घेतले. एलके जीमध्ये शिकणाऱ्या मुलीला शाळेतून आणण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर दोघांचे भांडण विकोपाला गेले. रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळला. दुपारी २ वाजल्यापासून घरी तो आणि सहा महिन्याची मुलगी होती. पत्नी खाली पडल्याने तोही अस्वस्थ बनला. सायंकाळी काही उशीर तो घरी बसून होता. मुलींचे रडणे असह्य झाल्याने त्याने आपल्या घरी विजापूरला तसेच सासरवाडीला फोन करून पत्नीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले.

हेही वाचा- बाळासाहेब थोरात म्हणाले..मला काय विचारता, मी पाहुणा -

 तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असे तो सांगत होता

यावेळी त्याच्या नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. परंतु डॉक्‍टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. दुपारीच तिचा मृत्यू झाला होत.प्रथमदर्शनीच गळा दाबल्याचे व्रण आढळून आले आहेत. आधी पोलिसांनाही तो झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचेच सांगत होता. परंतु, पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कबूल केले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. कॅम्पचे प्रभारी पोलीस निरीक्षक धीरज शिंदे अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum husband murder by strangles wife marathi news