esakal | लॉकडाउनची अचानक अंमलबजावणी; बेळगावात गोंधळाची स्थिती

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनची अचानक अंमलबजावणी; बेळगावात गोंधळाची स्थिती
लॉकडाउनची अचानक अंमलबजावणी; बेळगावात गोंधळाची स्थिती
sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : बेळगावात गुरूवारी (२२) दुपारी मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केली. केवळ शनिवारी व रविवार दोनच दिवस लॉकडाऊन होणार असल्याची अपुरी माहिती बेळगावातील व्यावसायिकांना मिळाली होती. त्यामुळे गुरूवारी सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार सुरू करण्यात आले होते. परंतु सोमवारी ते शुक्रवार या काळातही अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश आहे. त्याबाबत बुधवारी रात्री उशिरा राज्याच्या मुख्य सचिवांनी नवा आदेश बजावला होता. विशेष म्हणजे महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी त्याबाबत अनभिज्ञ होते.

गरूवारी सर्व व्यवहार सुरू झाल्याचे पाहून जिल्हाधिकारी हरीषकुमार यांनी महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. दुपारी एक वाजल्यानंतर पोलिस रस्त्यावर उतरले व कारवाईला सुरूवात केली. शहरातील किराणा, रेशन व अत्यावश्‍यक सेवेशी संबंधित आस्थापने सोडून अन्य आस्थापने बंद करावयास लावली. शहरात रस्त्यावर जे बैठे विक्रेते व फेरीवाले होते, त्यांनाही व्यवसाय बंद करून घरी जाण्यास सांगण्यात आले. पोलिस वाहनातून ध्वनीक्षेपकावरून आस्थापने बंद करण्याचे आवाहन करीत होते. प्रारंभी काही व्यावसायीकाना त्याला प्रतिसाद दिला नाही, पण पोलिसांनी दंडुका उगारल्यानंतर मात्र त्यांनीही आस्थापने बंद केली. त्यामुळे गुरूवारी दुपारनंतर बेळगावात संचारबंदीसदृश्‍य स्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे बाजारपेठेत धावपळ सुरू झाली. शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे का? अशी विचारणा होवू लागली. पण राज्यशासनाच्या आदेशानुसारच आस्थापने बंद केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर नागरीकांनीही सहकार्याची भूमिका घेतली. या कारवाईमुळे बाजारहाट व अन्य कामासाठी बेळगावात आलेल्या ग्रामिण भागातील नागरीकांची चांगलीच धावपळ उडाली. येत्या चार दिवसांत लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्या खरेदीसाठी गुरूवारी बाजारपेठेत गर्दी झाली होती. पण खरेदी सुरू असतानाच पोलिसांनी आस्थापने बंद करणे भाग पडले. त्यामुळे अनेकांना खरेदी अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.

शहरात दुचाकी व चारचाकी घेवून फिरणार्यांवरही कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचाही मोठी गोची झाली. राज्यशासनाने मंगळवारी जो आदेश बजावला त्यात केवळ विकेंड लॉकडाऊन व रात्रीच्या संचारबंदीचा उल्लेख होता. त्यामुळे केवळ शनिवारी व रविवारीच व्यवसाय बंद ठेवावे लागणार असा समज व्यावसायिकांनी करून घेतला होता.

सोमवार त शुक्रवार या काळात व्यवसाय सुरू राहणार की नाही? याबाबत राज्यभरात संभ्रम होता. बुधवारी दिवसभरात त्याबाबत विचारणा झाली. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव पी. विजयकुमार यांनी गुरूवारी रात्री याबाबतचा नवा आदेश बजावला. त्यात सोमवार ते शुक्रवार या काळातही अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले. पण या आदेशाची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनाही नव्हती. गुरूवारी सकाळी त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अंमलबजावणीला सुरूवात झाली. पण यामुळे संपूर्ण बेळगाव शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.