बेळगाव : KPTCL प्रकरणांत आणखी ३ अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अटक

बेळगाव : KPTCL प्रकरणांत आणखी ३ अटक

बेळगाव : केपीटीसीएल (कर्नाटक वीज प्रसारण निगम नियमित) कनिष्ठ दर्जा सहायक पदासाठी झालेल्या परीक्षेवेळी ‘ब्लूटूथ’ डिव्हाइस उपयोग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी तिघांना आज (ता.२४) अटक करण्यात आली. यापूर्वी परीक्षार्थी, पर्यवेक्षक, उपप्राचार्य मिळून १० जणांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये तिघांची भर पडली. त्यामुळे याविरोधातील कारवाईत आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे.

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणातर्फे नुकताच केपीटीसीएल कनिष्ठ दर्जा सहायक पदासाठी परीक्षा होती. यावेळी एका परीक्षार्थीने स्मार्ट वॉचचा उपयोग करून प्रश्न पत्रिकेचा फोटो टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून मित्राला पाठवून बेकायदेशीरीत्या परीक्षा दिली, अशी फिर्याद ९ ऑगस्टला चिकोडी पदवीपूर्व शिक्षण खात्यातील द्वितीय दर्जा सहायक सचिन श्रीधर कमतर (वय ३२, रा. गोकाक) यांनी गोकाक शहर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी मुख्य संशयित परीक्षार्थीला अटक करून त्याची चौकशी केली. त्यामध्ये सहभागी असलेल्या केपीटीसीएल परीक्षेतील पर्यवेक्षक आणि महाविद्यालयाचे उपप्रचार्य व प्राचार्याचा मुलगा असे मिळून दहा जणांना अटक करण्यात आली.

त्यामध्ये आता प्रकरणांत आणखी तिघांना अटक करण्यात आली. अडेश इराप्पा नागनुरी (२६, कमतनुर), मडिवाळप्पा बाळाप्पा तोरनगट्टी (३६, रा. नावलगट्टी, बैलहोंगल) आणि शंकर कल्लाप्पा उनकल (३०, रा. होसकोटी, ता. बैलहोंगल) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अडेश नागनुरी हुक्केरी सरकारी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक आहेत. गोकाक पोलिससह वरिष्ठ अधिकारी याची कसून चौकशी करत आहेत.

राज्यात धागेदोरे

मुडलगी तालुक्यातील नागनुरीमधील सिध्दाप्पा मदलीहाळ याला दहा ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून धक्कादायक माहिती उघडकीस आली व एकेक संशयिताला अटक करण्यात आली. यानुसार आतापर्यंत १३ जणांना अटक झाली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकरणाचे धागेदोरे राज्यात असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Belgaum Kptcl Cases 3 More Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..