मास्क न घालणे त्यांना पडले चांगलेच महागातः वाचा काय झाले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

मास्क न लावता शहरात फिरणाऱ्या केवळ 1447 जणांवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार 440 रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

बेळगाव ः मास्क न लावता शहरात फिरणाऱ्या केवळ 1447 जणांवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार 440 रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कारवाईचा निर्णय झाल्यानंतर शहरात काही ठिकाणी कारवाई सुरू झाली. पण 1 मेपासून संपूर्ण शहरात कारवाई सुरू करण्यात आली. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कारवाईची जबाबदारी देण्यात आली असून महिनाभरात आरोग्य विभागाने केवळ 1447 जणांवरच कारवाई केली आहे. शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्यांची संख्या पाहता ही कारवाई किरकोळ आहे. शिवाय गेल्या आठवडाभरात कारवाईत शिथिलता आल्याचेही नागरिकांचे म्हणने आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कर्नाटक सरकारने लॉकडाउन काही प्रमाणात शिथील केला. त्यावेळी मास्क वापरण्याची सक्ती नागरिकांना करण्यात आली. शिवाय रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. तर मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यानीही त्याबाबतचा आदेश बजावला. पण कारवाई कोणी करावी याबाबतची स्पष्टता नव्हती. त्यामुळे प्रारंभी काही दिवस पोलिस खात्याने कारवाई केली. 1 मे पासून ही जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभागाकडेच देण्यात आली आहे. पहिले दोन आठवडे आरोग्य निरीक्षक, पर्यवेक्षक, मुकादम यानी जोरदारपणेही मोहीम राबविली. पण मे महिन्याच्या अखेरीस कारवाई थंडावली. खासकरून कर्नाटकात लॉकडाउन आणखी थोडा शिथील झाला, सर्व व्यवहार सुरू झाले आणि कारवाई शिथील झाली.

वस्तुतः गेल्या आठवडाभरापासून बेळगावात रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. यावेळी बेळगावकरांनी खबरदारी घेणे आवश्‍यक होते, पण तसे झाले नाही. अनेकजण मास्क न वापरताच शहरात फिरत असल्याने इतरांनाही धोका निर्माण झाला आहे. परिणामी कारवाई पुन्हा सुरू करावी व त्यात सातत्य ठेवावे अशी मागणी होत आहे. गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांनी आरोग्य निरीक्षकांना नवी जबाबदारी दिली आहे. परराज्यातून बेळगाव शहरात येणाऱ्यांचे होम क्वारंटाईन करण्याचे काम आरोग्य निरीक्षकांना करावे लागत आहे. आधी हे काम महसूल निरीक्षक करीत होते, पण आता आरोग्य निरीक्षकांकडे हे काम आले आहे. त्यामुळे आरोग्य निरीक्षक होम क्वारंटाईनच्या कामात व्यस्त आहेत. पण मास्क न घातलेल्यांवर कारवाई करण्याची मोहीम मुकादम व पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून करता येणे शक्‍य आहे. पण सध्या तरी याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. 
--------------------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum Municipal Corporation against 1447 people without masks