साहित्यिकांवरह पोलिसांची दडपशाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रमुख अतिथी बबन पोतदार व अन्य साहित्यिकांना अटक करण्याची धमकी खानापूरच्या पोलिस निरीक्षकांनी रविवारी (ता. 12) सकाळी आठ वाजता फोनवरून दिली. तसेच त्यांना संमेलनस्थळी जाण्यापासूनही रोखण्यात आले.

बेळगाव ः इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रमुख अतिथी बबन पोतदार व अन्य साहित्यिकांना अटक करण्याची धमकी खानापूरच्या पोलिस निरीक्षकांनी रविवारी (ता. 12) सकाळी आठ वाजता फोनवरून दिली. तसेच त्यांना संमेलनस्थळी जाण्यापासूनही रोखण्यात आले. तर कुद्रेमानी येथील साहित्य संमेलनात चंदगडचे आमदार राजेश पाटील यांना प्रवेश देऊ नये, अशी अट आयोजकांना घालून त्यांचा सहभाग रद्द केला. या कुत्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पोलिसी दडपशाहीच्या माध्यमातून घाला घालण्यात आल्याची टीका साहित्य क्षेत्रातून होत आहे. 

हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

कुद्रेमानी येथे आमदार राजेश पाटील यांचा सत्कार होणार होता. पण, पोलिसांनी आयोजकांवर दबाव आणला. जर आमदार पाटील येथे आले तर यापुढे कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, अशी भीती घातली. त्यामुळे पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यात मराठीविरोधात प्रचंड दडपशाहीचे धोरण सुरू केल्याचे स्पष्ट झाले. 
इदलहोंड येथील संमेलनस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात होता. संमेलनाध्यक्ष व अन्य साहित्यिकांना अटक करण्याची तयारी केली आहे, अशी धमकीही पोलिसांनी संमेलनाध्यक्ष सबनीस व मान्यवरांना दिली. दरम्यान, संमेलनाला तोंडी परवानगी देण्यात आली होती, पण लेखी परवानगी दिलेली नाही, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. शिवाय पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली. त्यामुळे अध्यक्ष सबनीस, त्यांच्या पत्नी ललिता सबनीस, गुंफणचे उपाध्यक्ष व संमेलनाचे प्रमुख अतिथी बबन पोतदार, साहित्यिक प्रदीप सिंघवी, शिवाजी फाटक, चंद्रकांत जोगदंड, मुकुंद महामुनी, आत्माराम हारे यांनी थेट बेळगावला जाण्याचा निर्णय घेतला. बेळगावात येताच त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधत पत्रकार परिषद घेतली. 

हे पण वाचा - महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

श्री. पोतदार यांनी शनिवारी सायंकाळपासून कोणकोणत्या घडामोडी घडल्या याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सर्व साहित्यिक शनिवारी सायंकाळीच खानापुरात पोहोचले होते. तेथील शासकीय विश्रामधामात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस व त्यांच्या पत्नी विश्रामधामात पोहोचल्या. सकाळी ते संमेलनात सहभागी होण्यासाठी जात असतानाच त्यांना रोखण्यात आले. त्यांना थेट अटक करण्याची धमकीही पोलिसांनी दिली. त्यामुळे त्यांनी संमेलनस्थळी न जाण्याचा निर्णय घेतला. गुंफण साहित्य अकादमीचे अध्यक्ष बसवेश्‍वर चेनगे व त्यांचे अनेक सहकारीही शनिवारीच बेळगावात आले होते. त्यांनीही संमेलनस्थळी न जाण्याचा निर्णय घेत माघारी फिरले. महाराष्ट्रातील कोणत्याही साहित्यिकाला संमेलनस्थळी जावू द्यायचे नाही, या उद्देशानेच पोलिसांनी दडपशाही सुरू केली. गुंफण साहित्य अकादमी हे सातारा जिल्ह्यातील कराडजवळील मसूर गावात आहे. या अकादमीतर्फे आतापर्यंत 16 साहित्य संमेलने भरविण्यात आली आहेत. बेळगाव जिल्ह्यात जांबोटी, मणतुर्गा व कावळेवाडी या तीन ठिकाणी गुंफण साहित्य संमेलन झाले आहे. 

हे पण वाचा - कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार...?

बेळगाव पोलिसही नजर ठेवून 
यंदा इदलहोंड येथे 17 वे साहित्य संमेलन झाले. पण, या संमेलनाच्या अध्यक्षांना पोलिसांनी संमेलनात सहभागी होऊ दिले नाही. त्यामुळे सीमाभागातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सीमाभागातच नव्हे, तर साहित्यक्षेत्रात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे मत साहित्यिकांनी व्यक्त केले आहे. श्रीपाल सबनीस व साहित्यिक बेळगावात आल्यानंतर येथील स्थानिक पोलिसही त्यांच्यावर नजर ठेवून होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum Police close for Gunfan Sahitya Sammelan