Belgaum | पदव्यूत्तर परीक्षांचा निकाल लटकला; विद्यार्थ्यांतून नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rani channamma university

बेळगाव : पदव्यूत्तर परीक्षांचा निकाल लटकला; विद्यार्थ्यांतून नाराजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या पदव्यूत्तर परीक्षांचा निकाल सुमारे तीन महिन्यांनंतरही लावण्यात आलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून येत आहे. परीक्षेसंबंधी विद्यापीठाशी संपर्क साधून निकालासंबंधी विचारणा केली असता अजून महिन्यानंतर निकाल लागेल, असे उत्तर विद्यार्थ्यांना दिले जात आहे. यामुळे विद्यापीठाच्या या भुमिकेबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक वर्ष पुढे ढकलले. तसेच राज्यात मार्च दरम्यान परिवहन कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे पदव्यूत्तरच्या तिसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे या परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. तिसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षा होऊन तीन महिने उलटले तरी देखील अद्याप निकाल लागलेला नाही. तिसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षा झाल्यानंतर लगेच चौथ्या सेमीस्टरच्या परीक्षाही झाल्या. या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या. यांचा निकालही अध्याप लावण्यात आलेला नाही. विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल किमान दिड ते दोन महिन्यात लागतो. मात्र, यावेळी तीन महिने उलटले तरी देखील निकाल का लागला नाही. असा सवाल विद्यार्थ्यांतून उपस्थित केला जात आहे.

ऑगस्ट महिन्यात आरसीयु अंतर्गत येणाऱ्या पदवीच्या व पदव्यूत्तरच्या परीक्षाही एकदाच झाल्या होत्या. मात्र, पदवीच्या परीक्षांचा निकाल लागून महिना उलटला आहे. त्यांची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. मात्र, अध्यापही पदव्यूत्तर परीक्षांचा निकाला लागलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून येत आहे. यासंबंधी काही विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाशी संपर्क साधून निकालाची विचारणा केली असता अजून महिन्यानंतर निकाल लागेल असे उत्तर कुलसचीव कार्यालयातून दिले जात आहे.

स्टुडंट पोर्टलवर निकाल

पदव्यूत्तर विद्यार्थ्यांचे स्वतंत्र असे स्टुडंट पोर्टल विद्यापीठाने तयार केले आहे. यामाध्यमातून अर्ज भरणे, जुन्या प्रश्‍नपत्रिका पाहणे व इतर शैक्षणिक माहिती दिली जाते. तसेच निकालाची माहितीही यात दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांकडून वारंवार स्टुडंट पोर्टलवर निकाल बघितला जात आहे. मात्र, ‘नो डाटा’ अशी माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी आहे.

loading image
go to top