बेळगाव : सासनकाठी यंदा जोतिबाला जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबा

बेळगाव : सासनकाठी यंदा जोतिबाला जाणार

दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू

सासनकाठीला २०९ वर्षांपूर्वी सुरुवात चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठीच्या परंपरेला २०१३ मध्ये २०० वर्षे पूर्ण झाली. गल्लीतून निघणाऱ्या सासनकाठीची परंपरा आत्तापर्यंत फक्त दोनवेळा खंडित झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे परंपरा खंडित झाली होती. मात्र यात्रा काळात करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम गल्लीत करण्यात आले होते. १६ एप्रिलला चैत्र पौर्णिमा असून त्यापूर्वी सात एप्रिलला सायंकाळी सासनकाठी वाजत-गाजत डोंगरावर प्रस्थान करणार असून कामदा एकादशीदिवशी १२ एप्रिलला सासनकाठी डोंगरावर पोहोचणार आहे. मानाची काठी डोंगरावर पोचल्यानंतर जोतिबाचे पुजारी पुढे येऊन दक्षिणद्वार येथे पूजन व आरती करतात. तसेच त्यांना मानाचा विडा दिला जातो. डोंगरावरील धार्मिक विधी पार पडल्यानंतर भक्त पुन्हा चालत बेळगावला परत येतात. त्यानंतर शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर येथे यात्रोत्सव होतो. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात.

५८ वर्षापूर्वी परंपरा सुरु

नार्वेकर गल्ली (बेळगाव) येथून चैत्र पौर्णिमा यात्रेवेळी जोतिबा डोंगरावर देवाची मूर्ती घेऊन भक्तगण उत्साहात डोंगरावर दाखल होतात. गल्लीतील दादा अष्टेकर हे जोतिबा देवाचे परमभक्त होते. त्यांनी ५८ वर्षांपूर्वी ही परंपरा सुरु केली. डोंगरावर चालत जाऊन त्या ठिकाणी विविध धार्मिक विधी करून भक्तगण परत येतात. पंधरा दिवसांच्या प्रवासामध्ये सजविण्यात आलेल्या बैलगाड्यांसह भक्तगण देवाच्या दर्शनासाठी जात असतात. तसेच परत आल्यानंतर वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. यामध्ये भाविक सहभागी होतात, अशी माहिती प्रथमेश अष्टेकर यांनी दिली.

३२ वर्षांनंतर परंपरा पुन्हा सुरु

नार्वेकर गल्ली (शहापूर) येथील सासनकाठीला देखील मोठी परंपरा आहे. मात्र काही वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. मात्र ३२ वर्षांपासून पुन्हा ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. चव्हाट गल्लीतील सासनकाठी घेऊन भक्त चालत डोंगरावर दाखल होतात. मात्र नार्वेकर गल्लीतील भाविक बस किंवा इतर वाहनाद्वारे डोंगरावर पोहचतात. तसेच डोंगरावर जाऊन आल्यानंतर मिरवणुकीने भक्त घरी येतात. तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, अशी माहिती आदिनाथ लाटूकर यांनी दिली आहे.

एक नजर

७ एप्रिलला सांयकाळी चव्हाट गल्लीतून सासनकाठी निघणार

८ एप्रिलला हत्तरगी येथे विश्रांती. संकेश्वर येथे मुक्काम.

९ एप्रिलला निपाणी येथे विश्रांती. सौंदलगा येथे मुक्काम.

१० एप्रिलला कागल येथे विश्रांती. गोकुळ शिरगाव येथे मुक्काम.

११ एप्रिलला पंचगंगा नदीवर विश्रांती. वडणगे येथे मुक्काम.

१२ ते १६ एप्रिल डोंगरावर मुक्काम.

Web Title: Belgaum Sasankathi Jyotibala Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..