
बेळगाव : महापालिकेला प्रतीक्षा तीन योजनांची
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीमुळे थांबलेल्या महापालिकेच्या तीन योजना निवडणुकीनंतर तरी मार्गी लागणार का, याची बेळगावकरांना प्रतीक्षा आहे. मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी ठेकेदार निश्चित झाला असला तरी महापालिकेने अद्याप ठेकेदाराला कार्यआदेश दिलेला नाही. शहर स्वच्छतेचा ठेका देण्यासाठी तिसऱ्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रसिद्ध बीव्हीजी कंपनीने निविदा दाखल केली, पण कंपनीच्या निविदा अर्जाची अद्याप तांत्रिक पडताळणी झालेली नाही.
सदाशिवनगर व शहापूर या दोन स्मशानभूमींमध्ये गोवऱ्यांच्या माध्यमातून मोफत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, पण पूर्ण क्षमतेने ही योजना सुरू झालेली नाही. विधान परिषद निवडणूक झाल्यावर या योजनेचे उद्घाटन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते केले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक संपण्याची प्रतीक्षा महापालिकेला आहे. बुधवारी (ता. १५) विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी होणार असून त्यानंतर या
तिन्ही योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे. मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका देण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेत कर्नाटकातीलच व्हाईसलेस या संस्थेने सहभाग घेतला. त्या संस्थेलाच नसबंदीचा ठेका देण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेने श्रीनगर येथे शस्त्रक्रियागृह बांधले आहे.
आता केवळ ठेकेदाराला कार्यआदेश देऊन प्रत्यक्ष नसबंदी मोहीम सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, त्याला विधान परिषद निवडणुकीचा अडथळा आला होता. त्यामुळे १५ जूननंतर प्रत्यक्षात नसबंदी मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात बेळगावात मोकाट कुत्र्यांकडून हल्ल्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ही मोहीम राबविल्यास मोकाट कुत्र्यांची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. शहर स्वच्छतेचा ठेका देण्यासाठी महापालिकेने तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला. घनकचरा निर्मूलनाच्या कामाचा मोठा अनुभव असलेल्या बीव्हीजी कंपनीने निविदा दाखल केली. एकच निविदा दाखल झाली असली तरी तांत्रिक पडताळणी करून या कामाचा ठेका कंपनीला दिला जाऊ शकतो. गोवऱ्यांवरील अंत्यसंस्कार योजना कोल्हापूरच्या धर्तीवर राबविली जाणार आहे. यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद महापालिकेने अर्थसंकल्पात केली आहे. पहिल्या टप्प्यात दोन स्मशानभूमीत ही योजना राबविली जाणार आहे. ही योजना लवकर सुरू व्हावी, असे नागरिकांना वाटते.
Web Title: Belgaummunicipal Corporation Elections Nmc Awaits Three Schemes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..