
बेळगाव : जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकात 'उष्मा तीव्र'
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकात उष्मा तीव्र झाला असल्याने रोजगार हमी योजनेच्या कामाच्या टार्गेटमध्ये कपात करण्यात आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याने याबाबत आदेश जिल्हा पंचायतीला बजावला आहे.
उन्हाच्या झळा अधिक तीव्र असणाऱ्या उत्तर कर्नाटकात दरवर्षी ग्रामीण भागातील कामगारांवर उष्म्याचा अधिक परिणाम होऊ नये, यासाठी अशा प्रकारे निर्णय घेतला जातो. यंदा देखील तापमानात वाढ झाली असल्यामुळे पंचायतराज खात्याने याबाबत आदेश बजावत मजुरांच्या कामाच्या बोजामध्ये कपात केली आहे. बेळगाव विभागातील बेळगाव, हावेरी, गदग, बागलकोट, रायचूर, विजापूर, कारवार जिल्ह्यांसह गुलबर्गा विभागातील जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
रोजगार हमी योजनेतून एखाद्या ठिकाणाची खोदाई किंवा बांधकाम करायचे असल्यास तसा टार्गेट प्रत्येक मजुराला दिला जातो. पण नियमित असणाऱ्या टार्गेटपेक्षा या दिवसात हे टार्गेट केवळ ७० टक्के असणार आहे. जून महिन्यासाठी देखील कामाच्या प्रमाणात कपात करण्यात आली असून २० टक्के कामाची सुट देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे रोहयोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, प्रथमोपचार आदी मूलभूत सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचा आदेश नुकताच बजावण्यात आला आहे. रोहयो कर्मचाऱ्यांनी ३० टक्के काम कमी केले तरी त्यांना पूर्ण मजुरी मिळणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन असे काम सध्या सुरू आहे. कामगारांना त्यांच्या हजेरीमध्ये देखील सवलत देण्यात आली असून सध्या दिवसभरात केवळ एकच वेळा हजेरी द्यावी लागत आहे.
प्रतिक्रिया
उस्मा काळात जळगाव जिल्ह्यात ३६ डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान नोंद होते. त्यामुळे उन्हाळ्यात रोहयो मजुरांना सामान्यपणे कामांमध्ये सूट दिली जाते. एप्रिल आणि मे महिन्यासाठी ३० टक्के विश्रांती सूट असते. मागील वर्षी देखील अशाप्रकारे कामात सुट्टी देण्यात आली होती.
-एच. व्ही. दर्शन, सीईओ जिल्हा पंचायत.
Web Title: Belgoan Heat Intense North Karnataka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..