esakal | सांगली एसटी कर्मचाऱ्यांची "बेस्ट' सेवा धोकादायक 

बोलून बातमी शोधा

एस. टी. च्या सांगली विभागातून मुंबई "बेस्ट' सेवेसाठी जाणारे चालक-वाहक हे कोरोनाचे प्रसारक ठरत आहेत. }

एस. टी. च्या सांगली विभागातून मुंबई "बेस्ट' सेवेसाठी जाणारे चालक-वाहक हे कोरोनाचे प्रसारक ठरत आहेत.

सांगली एसटी कर्मचाऱ्यांची "बेस्ट' सेवा धोकादायक 
sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : एस. टी. च्या सांगली विभागातून मुंबई "बेस्ट' सेवेसाठी जाणारे चालक-वाहक हे कोरोनाचे प्रसारक ठरत आहेत. सहा महिने बेस्ट सेवा करूनही आणखी सेवेची अपेक्षा सांगली विभागाकडून केली जात आहे. त्यामुळे चालक वाहक वर्गातून संतापाची लाट उसळली आहे. 

कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असताना चालक वाहकांचा मुंबई दौरा या वाढीला पूरक ठरत आहे. सप्टेंबर महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील शंभर चालक व शंभर वाहक हे मुंबईत बेस्ट सेवेसाठी जात आहेत. मुंबईत गेलेल्या शेकडो चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे संबंधित कर्मचारी व कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला.

सुरवातीला पंधरा दिवस सेवा करावी लागत होती. परंतु मागील महिन्यापासून आठ दिवस अशा पद्धतीने ही सेवा सुरू आहे. वास्तविक जवळच्या कोल्हापूर किंवा अन्य काही विभागांतील कर्मचारी बेस्ट सेवेसाठी पाठवले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. सांगलीतील कर्मचाऱ्यांना मात्र धोका पत्करायला पाठवले जाते. 

दोन दिवसांपूर्वी एसटी ने एक परिपत्रक काढले आहे. त्यात यावेळी सांगली विभागाऐवजी बुलढाणा विभाग काम करेल असे सूचित केले आहे. परंतु त्या परिपत्रकात एक मेख आहे. सांगली विभागाचे पन्नास टक्के कर्मचारी "बेस्ट' ची सेवा करतील असे सूचित केले आहे. यामुळे जिल्ह्यातील एस. टी. च्या चालक वाहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सगळ्यांनी सेवा बजावणे बंधनकारक असताना सांगली विभागावरच अन्याय का? जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत गांभीर्य घेणार की नाही? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

वास्तविक सप्टेंबर महिन्यापासून ही सेवा सांगली विभागतील चालक वाहक देत असतील तर येथून पुढे एस. टी. च्या इतर विभागाने ही सेवा द्यावी. अनेक कर्मचारी विविध आजाराने त्रस्त आहेत. वृद्ध आई वडिलांची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम आणि लोकप्रतिनिधींनी यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून कामगारांना न्याय द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सांगली विभागातील कर्मचारी बेस्ट सेवेसाठी पाठवू नयेत

सांगली विभागाचे कर्मचारी धोका पत्करून सप्टेंबरपासून बेस्ट च्या सेवेसाठी जात आहेत. परंतु सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे सांगली विभागातील कर्मचारी बेस्ट सेवेसाठी पाठवू नयेत. अन्यथा पुढील सर्व घटनांना प्रशासन जबाबदार राहील.
- अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

संपादन : युवराज यादव