जयंतरावांकडून कॉंग्रेसचा विश्‍वासघात : जितेंद्र पाटील... बाजार समितीत बाजार, राष्ट्रवादीत प्रवेश दिलाच कसा? 

अजित झळके
Thursday, 8 October 2020

सांगली- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याच्या अटीवर प्रवेशाचा बाजार केला. हे करताना त्यांनी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाचाही विश्‍वासघात केला आहे. तीन पक्षांची एकत्र सत्ता असताना त्यातीलच लोक फोडले जात असतील तर महाविकास आघाडी हवीय कशाला, असा सवाल कॉंग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांनी आज केला. 

बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह दिवंगत मदन पाटील समर्थक गटाने रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावर जितेंद्र पाटील यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, ""दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, तानाजी पाटील, खंडेराव जगताप आदी लोक आधीपासून मदनभाऊ गटाचे म्हणून ओळखळे जातात. या लोकांनी राजकीय अडचणीमुळे काही काळ पक्षात राहून वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असतील, मात्र त्यामुळे ते कॉंग्रेसचे नव्हते, असे म्हणता येत नाही. त्यांचा या घडीला राष्ट्रवादीत झालेला प्रवेश हा कॉंग्रेसमधूनच झाला आहे. हे करताना जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्यात शिवसेना, राष्ट्रवादीसह कॉंग्रेस प्रमुख पक्ष असल्याचे ते विसरले आहेत. मध्यंतरी काही लोकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, तो रद्द करावा लागला. सांगलीत श्रीमती जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा होती, तीही महाविकास आघाडीच्या कारणानेच लांबल्याचे सांगितले जाते. अशावेळी हळूच काही लोक फोडले जातात कसे?'' 

ते म्हणाले, ""बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला जाऊ नये, या मुद्यावर हा प्रवेशाचा बाजार झाल्याचा आमचा संशय आहे. त्याला वाव मिळणारे चित्र दिसते आहे. जयंत पाटील यांनी अशा पद्धतीचे राजकारण करून कॉंग्रेस संपवण्याचा प्रयत्न करू नये. याआधी त्यांनी अनेकदा असे डाव खेळले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही याकडे गांभीर्याने पहावे.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Betrayal of Congress by Jayantarao: Jitendra Patil