Vidhan Sabha 2019 : ‘राजे, जनताच तुम्हाला शिक्षा करेल’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही. जनता तुम्हाला शिक्षा करेल, अशा शब्दांत श्रमिक मुक्‍ती दलाचे संस्थापक, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर घणाघाती तोफ डागली. 

सातारा : जनतेला तुम्ही म्हणाला होता, की हा मोदी कोण? कोण लागून गेला, त्याला घाबरायचे काय काम? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे; पण आता पेढेवाला नाही का? 15 लाख दिले नाहीत, नोटाबंदीने उद्योग बंद पडले. हे सगळे तुम्ही विसरून गेला का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही. जनता तुम्हाला शिक्षा करेल, अशा शब्दांत श्रमिक मुक्‍ती दलाचे संस्थापक, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर घणाघाती तोफ डागली. 

विधानसभा व सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने श्रमिक मुक्‍ती दलाची भूमिका जाहीर करण्यासाठी आज डॉ. पाटणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्‌द्‌यावर त्यांनी सडकून टीका केली.

डॉ. पाटणकर म्हणाले, ""आमच्या संघटनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतील उमेदवारांसाठी दहा मुद्‌द्‌यांवर पाठिंबा दर्शविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप-शिवसेना पक्ष हुकूमशाही पद्धतीचा जायीतवाद, धर्मांध, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाठीशी घालणारे आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करून जनतेच्या लोकशाहीची अंमलबजावणी करण्यासाठी नवे सरकार निर्माण केले पाहिजे. राज्यातील प्रत्येक कुटुंबांची शेती बारमाही बागायत करण्यासाठी समान न्यायाच्या पद्धतीने पाणी दिले पाहिजे. त्यासाठी आटपाडी पॅटर्न सार्वत्रिक केला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना जमिनी व त्या जमिनींना पाणी मिळेपर्यंत दरमहा 15 हजार रुपये निर्वाहभत्ता मिळण्यासाठी संघर्षामध्ये सहभागी झाले पाहिजे.'' 

विकास निधी, आमदार फंडातून "श्रमुद'च्या गाव समितीच्या सहमतीप्रमाणेही कामे करावीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत "श्रमुद'च्या विचाराने उमेदवारांबाबत निर्णय घ्यावा. "श्रमुद'च्या आंदोलनात सहभागी व्हावे. प्रचारामधील फलकांवर "श्रमुद'चे नाव व अध्यक्षांचे छायाचित्र प्रसिद्ध करावे, तसेच निवडून आल्यानंतर भाजप, शिवसेनेत जाऊ नये आदी दहा मुद्‌द्यांवर सहमती दर्शवतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहू. श्रीनिवास पाटील यांनीही ते मान्य केल्यास त्यांच्यासाठीही मेळावे घेऊ. (ता. 10 ऑक्‍टोबरपर्यंत) उमेदवारांच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत, अशी भूमिका डॉ. पाटणकर यांनी व्यक्‍त केली. या वेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, राज्य कार्यकारिणी सदस्य संपत देसाई, जयंत निकम, दिलीप पाटील, चैतन्य दळवी, मालोजी पाटणकर, सुरेश पाटील आदी उपस्थितीत होते. 

जाहीरनामे नसल्याची खंत 
"श्रमुद'ची ताकद राज्यातील 32 मतदारसंघांत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे चांगली ताकद असून, पुणे, रायगड, नवी मुंबई, नंदूरबार, औरंगाबाद, सोलापूर, लातूर आदी जिल्ह्यांतही लक्षणीय ताकद आहे. पैठण मतदारसंघातून "श्रमुद'चे जिल्हाध्यक्ष सुखदेव बन हे निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांची जाहीरनाम्यांवर चर्चा होत नाही. केवळ जागा वाटपावर चर्चा होते, याची खंत वाटते, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat patankar crtisize Udayanraje Bhosale