भरधाव ट्रक घुसला...दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला...

विजय लोहार 
Tuesday, 4 August 2020

पुणे- बंगळूर महामार्गावर मालखेड येथे उभारलेल्या जिल्हा हद्दीवर पोलिसांच्या तंबूत बॅरिकेट तोडून भरधाव वेगाने ट्रक शिरला.

नेर्ले : पुणे- बंगळूर महामार्गावर मालखेड येथे उभारलेल्या जिल्हा हद्दीवर पोलिसांच्या तंबूत बॅरिकेट तोडून भरधाव वेगाने ट्रक या अपघातात कासेगाव येथील शिक्षक आत्माराम ज्ञानदेव मिसाळ ( वय-52) यांच्या मांडीला मार लागून ते जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. 

घटनास्थळावरून मिळालेली बातमी अशी की, राष्ट्रीय महामार्ग वरील सांगली, सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी म तपासणी नाके उभे आहेत. मार्चपासून येथे पोलीस वाहनांची तपासणी करतात. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर कडून भरधाव वेगाने कराडच्या दिशेने चाललेला ट्रक (क्रमांक एम एच 9 सी ए 9858)हा लावलेले बॅरिकेट तोडून तंबूत शिरला. यावेळी तेथे तपासणीसाठी ड्युटी करत असलेले कासेगाव ता वाळवा येथील शिक्षक आत्माराम ज्ञानदेव मिसाळ यांना ट्रकने खुर्चीसह सुमारे वीस फूट फरफटत नेले अचानकपणे झालेल्या अपघाताने मिसाळ हे ट्रकच्या पुढच्या बाजूस खाली सापडले. यावेळी त्यांच्या मांडीला जबर मार लागला.ट्रक अचानक तंबू व शेडमध्ये शिरल्याने शेड खाली कोसळले.

यावेळी मिसाळ यांची गाडी, लोखंडी बॅरिकेट,खुर्च्या,टेबल,कागदपत्रे,बोर्ड व इतर साहित्य क्षणार्धात विखुरले. ट्रकच्या पुढे जाऊन पडली होती, या अपघाता वेळी प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचारी बाजूला पळाले.अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. कासेगाव कराड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर अपघात झाला असून सदर ठिकाणी चेक नाका,बॅरिकेट असताना देखील हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक, निष्काळजीपणे दारू पिऊन ट्रक चालवून ट्रक सदर चेकपोस्ट मध्ये धडकून अपघातास कारणीभूत ठरलेबद्दल चालक मियाज अमीर शब्बीर पठाण (वय 38 रा हातकणंगले ता कोल्हापूर) याच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालकास अटक करण्यात आले आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर करत आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhardhaw truck rammed ... God saved his life as a force ...