‘भटवाडी-मुंबई’ पुन्हा धावू लागली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

एक नजर

  • चार महिन्यांपासून विश्रांती घेतलेली लालपरी ‘भटवाडी-मुंबई’ पुन्हा धावू लागली.
  • प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण
  • स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली पाटगाव-मुंबई व नंतरच्या काळात नामांतर होऊन धावू लागली भटवाडी-मुंबई.
  • ही बस प्रवाशांच्या कमतरतेमुळे व आर्थिक तोटा होत असल्याने झाली होती बंद.
  • प्रवाशांच्या सततच्या मागणी वरून पुन्हा सुरू. 

कडगाव - चार महिन्यांपासून विश्रांती घेतलेली लालपरी ‘भटवाडी-मुंबई’ पुन्हा धावू लागल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली पाटगाव-मुंबई व नंतरच्या काळात नामांतर होऊन धावू लागलेली भटवाडी-मुंबई. ही बस प्रवाशांच्या कमतरतेमुळे व आर्थिक तोटा होत असल्याने बंद करावी लागली होती. परंतु प्रवाशांच्या सततच्या मागणी वरून पुन्हा सुरू झाली.

भटवाडी-मुंबई एसटी गेल्या चार महिन्यापासून बंद असल्याने चाकरमानी, शालेय विद्यार्थी यांच्यात नाराजी पसरली होती. भटवाडी ते मुंबई एसटी चालू करण्यासाठी अनेकवेळा विविध संघटनानी निवेदने व आंदोलनाचा इशारा दिला. 

भुदरगड तालुक्‍यातील पश्‍चिमेकडील शेवटचे टोक असणाऱ्या भटवाडीपासून आडे, माळवाडी, तळेगाव, मानोपे, चिक्केवाडी, पाटगाव, शिवडाव, तांबाळे दासेवाडी आदी गावांतील नोकरी निमित्ताने मुंबई-पुण्यात ये-जा करतात. प्रवाशी व चाकरमान्यांसाठी जिव्हाळ्याची असणारी भटवाडी-मुंबई (परेल) ही बस सेवा बंद केल्याने या परिसरात एस. टी. प्रशासनाबाबत नाराजी होती. याशिवाय मुंबईहून सायंकाळी सातला सुटणारी ही बस सकाळी आठ वाजता भटवाडी येथे पोहचत होती. प्रवाशांसह या बसचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना होतो.

तसेच पर्यटनाच्या दृष्टीने रांगणा किल्ला, सिद्धाच्या गुहा व पाटगाव धरण बॅकवॉटर या पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांनाही याच बसेस शिवाय पर्याय नसल्याने या बस बंद केल्याने पर्यटनावर देखील परिणाम होत होता. भटवाडी-मुंबई ही गारगोटी आगारातून धावणारी लांब पल्याची एकमेव बस आहे. पर्यटक, विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून गारगोटी आगाराने पूर्ववत बस सुरू केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhatwadi - Mumbai ST service starts