म्हैशीच्या रेडकासाठी गमवला त्याने जीव....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

हर्षल गाय व रेडकू चरण्यासाठी घेऊन गेला होता. अन्....

विटा (सांगली) : भिकवडी बूद्रुक ( ता. खानापूर ) येथे टेंभूच्या कालव्यात पडलेल्या रेडकाला वाचविण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. हर्षल रामचंद्र खरात ( भिकवडी ) असे त्याचे नाव आहे. भिकवडी हद्दीतून टेंभूचा कालवा गेला आहे. सध्या कालव्यातून पाणी वाहत आहे. हर्षल गाय व रेडकू चरण्यासाठी घेऊन गेला होता.

कालव्याच्याकडेला रेडकू चरत असताना अचानक ते कालव्यात पडले. पाण्याचा प्रवाह जादा असल्याने रेडकू पाण्याबरोबर वाहत जावू लागले. रेडकाला वाचविण्याच्या नादात हर्षल पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते. तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. तेथूनच राहुल सुडके हा तरूण निघाला होता. त्याने हर्षल पाण्यात पडल्याचे दिसताच कालव्याकडे धाव घेतली. परंतु तो कालव्यात आठ ते नऊ फूट पाणी असल्याने दिसला नाही.

हेही वाचा- ऑलिम्पिक विजेता जपानचा 'हा' खेळाडू बनला फूड डिलिव्हरी बॉय... -

याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच हर्षलचा शोध सुरू घेण्यास सुरुवात केली. अर्धाकिलोमीटर अंतरावर एका पूलाजवळ बेशुद्ध अवस्थेत लोकांना तो सापडला. त्याला उपचारासाठी विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची माहिती डॉ. अलोक नरदे यांनी विटा पोलिसात दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhikvadi accident case in sangli district