esakal | "भिलवाडा'चा धडा आणि गावांपुढची आव्हाने 
sakal

बोलून बातमी शोधा

 Bhilwara's lesson and the challenges facing the villages

सध्या गावागावांमध्ये रस्ते खोदून, अडथळे निर्माण करून कोरोना गावात येण्यापासून रोखण्याचा वरकरणी उपाययोजनांचा खटाटोपापलीकडे जाऊन गावकारभाऱ्यांनी कृतीप्रवण व्हायला हवे. "भिलवाडा'चा धडा घेतानाच "कोराना'नंतरची गावांपुढच्या आव्हानांचाही त्यांनी वेध घ्यायला हवा. म्हणून हा पंक्तीप्रपंच 

"भिलवाडा'चा धडा आणि गावांपुढची आव्हाने 

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

कोरोना आपत्तीविरोधात राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यात राबवलेल्या मॉडेलची सध्या सोशल मीडियासह मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे. हे मॉडेल म्हणजे रॉकेट सायन्स नाही तर उपलब्ध साधनसामग्री-मणुष्यबळात या आपत्तीला कसे प्रभावीपणे सामोरे जाता येईल याचा धडा आहे. सध्या गावागावांमध्ये रस्ते खोदून, अडथळे निर्माण करून कोरोना गावात येण्यापासून रोखण्याचा वरकरणी उपाययोजनांचा खटाटोपापलीकडे जाऊन गावकारभाऱ्यांनी कृतीप्रवण व्हायला हवे. "भिलवाडा'चा धडा घेतानाच "कोराना'नंतरची गावांपुढच्या आव्हानांचाही त्यांनी वेध घ्यायला हवा. म्हणून हा पंक्तीप्रपंच 

सध्या सुरू असलेली टाळेबंदी येत्या चार दिवसात कमी अधिक प्रमाणात उठेलच. गावापासून देशाचे चलनवलन पुन्हा रुळावर आणावेच लागेल. मात्र त्याआधी अनेक गावांमध्ये सुरू असलेला खटाटोप म्हणजे आपल्याकडील अंधश्रद्धेपोटीच्या उपाययोजनांच्या परिचय करून देणाऱ्याच ठराव्यात. अनेक गावांनी रस्तेच खोदले आहेत. तर काहींनी रस्त्यांवर अडथळे उभे केले आहेत. काहींनी गावच्या वेशीवरच स्वयंस्फूर्त चेकपोस्ट तयार केली असून ते विनामास्क समोरच्याची झाडाझडती घेत असतात. खरे असे हास्यास्पद प्रकार टाळून अधिक व्यवहार्य, विज्ञाननिष्ठ प्रयत्न करून गावाला कोरोनच्या आपत्तीतून वाचवण्याबरोबरच सरकारी यंत्रणांसाठी उपयोगी ठरतील अशा उपाययोजना ठरतील त्या कराव्यात यासाठी काही उसनवारी राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील प्रशासनाने केलेल्या उपायांमधून करता येईल. 

भिलवाडा कोरोनाने गाठलेला राजस्थानातील पहिला जिल्हा. भारतातच फारशी चर्चा नव्हती तेव्हा या जिल्ह्यात 30 कोरोना रुग्ण आढळले. त्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोग्य सचिव रोहित सिंग आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांना सर्वाधिकार देत उपाययोजनांचे आदेश दिले. 18 मार्चला सर्वात आधी म्हणजे देशात 23 मार्चला टाळेबंदी जाहीर होण्याआधी टाळेबंदी झाली. जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या साधारण 1500 तुकड्या केल्या. त्यांना कोरोनाविषयीच्या प्रसाराबद्दलचे प्राथमिक प्रशिक्षण देऊन घरोघरी पाठवले. ही पाहणी होती सर्वसाधारणपणे सर्दी-ताप-पडसे अशी लक्षणे असलेल्या व्यक्ती शोधण्यासाठीची. हे करतानाच अशा संशयितांना त्यांच्याच घरी वेगळ्या खोलीत राहण्याचा सक्तीवजा आदेश दिला गेला. त्यानंतर दररोज दोन वेळा हे कर्मचारी त्या घरात जाऊन संबंधित रुग्णाच्या सर्व लक्षणांची नोंद करून येऊ लागले. अवघ्या 5 दिवसांत 28 लाख लोकसंख्येची जणू आरोग्य छाननीच झाली. त्यातून 14 हजार जण सर्दी-तापाने आजारी असल्याचे आढळले. त्यानंतर अशा रुग्णांना हाताळण्यासाठी 24 तासांचा नियंत्रण कक्ष सुरू केला. घरातच अलग असलेल्या 14 हजार जणांना उपचारांबरोबरच त्यांचा शहर-परदेशांशी संबंध आला आहे का याची नोंद घेण्यात आली. ज्यांचा ताप बरा होत नाही आणि ज्यांचा इतिहास शंकास्पद आहे अशांचा जलद चाचण्या केल्या. यातून 27 जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 17 जण एकाच खासगी हॉस्पिटलचेच कर्मचारी होते. पुढच्या टप्प्यात कोरोना रुग्णांचे घर, गल्ली, परिसर हॉटस्पॉट गृहीत धरून त्याची नाकेबंदी केली. ते करताना अनेक शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्यांची हक्काची घरेही सोडावी लागली. या परिसराचे पुन्हा काटेकोर तपासणी केली. यासह अनेक प्रयत्नांसह या संपूर्ण जिल्ह्यातून फक्त दोघे प्राणास मुकले. आणि आता इथे नवे रुग्ण नाहीत. तिथला लढा अजूनही सुरुच आहे. 

या भिलवाडा मॉडेलची चर्चा खूप होत असताना गावागावांमध्ये मात्र अजूनही मेजवाण्या-गप्पांमध्येच दिवस सरत आहेत. प्रत्येक गावातील रुग्णांची, संशयित रुग्णांची नेमकी संख्या शोधणे अवघड नक्कीच नाही. आजघडीला कोरोनाची तीव्रता किती वाढेल याबद्दल अंदाज नाही. सध्याचे पुढे येणारे आकडे कमी संख्येने होणाऱ्या चाचण्यांभोवतीच मर्यादित आहेत. या रोगाचा गावपातळीपर्यंत प्रसार झाला आहे अथवा नाही याचा नेमका अंदाज नाही. शासन यंत्रणेला व्यापक प्रमाणावर चाचण्या करण्यासाठी अजूनही महिना दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्याआधी भिलवाडा पॅटर्नप्रमाणे गावागावातील ग्रामपंचायतीकडे उपलब्ध यंत्रणेमार्फत तापसदृश्‍य रुग्णांचा यादी बनवून सरकारी यंत्रणेचे काम सोपे करता येणे सहज शक्‍य आहे. 
कोविडच्या निमित्ताने अनेक संधी आणि आव्हाने गावांपुढे उभी राहिली आहेत. गावांमेध्य स्वच्छतेबाबतची व्यापक जागृती निर्माण करण्याची ही संधी असेल. त्यासाठी यापुढे शाळांमध्ये वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठीच्या सोयी सुविधा निर्माण कराव्या लागतील.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घराभोवतीचा परिसर -गटारे स्वच्छतेसाठीचे आवाहनही गावांना करता येईल. कोरोनानंतरच्या जगात अनेक क्षेत्रांमध्ये मंदीची लाट येईल, बेरोजगारी येईल असे सर्वच तज्ज्ञ सांगत असले तेच तज्ज्ञ शेतीबाबत मात्र प्रचंड आशावादी आहे. 134 कोटी खाणारी तोंडे असणारे मार्केट या देशात उपलब्ध आहे आणि त्याची सारी भिस्त ग्रामिण भागावरच आहे. कोविडला रोखण्यासाठी प्रतिकार क्षमता हवी. त्यासाठी चांगला आहार विशेषतः सेंद्रीय शेती उत्पादनांना मागणी यापुढे वाढेल. अपेक्षांची आणखी खूप मोठी यादी बनवता येईल. मात्र त्यासाठी गावकारभाऱ्यांनी थोडं डोळे किलकिले करून आजुबाजूला पहायला हवे.