video : भावाच्या पराभवाचा वचपा काढत हा मल्ल झाला मल्हार केसरी

विलास कुलकर्णी
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

यात्रोत्सवात रविवारी (ता. 9) छबिना मिरवणुकीत वैजापूर, चाळीसगाव, पुणे येथील बॅंड पथके, राहुरीच्या गाडगेबाबा आश्रमशाळेतील मुलांचे झांजपथक आकर्षण ठरले. खंडोबाच्या देवळासमोर वाघ्या-मुरळीचे जागरण गोंधळ व रात्री शोभेच्या दारूच्या आतषबाजीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

राहुरी : देवळाली प्रवरा येथे ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रोत्सवात तब्बल साडेतीन तास कुस्त्यांचा फड रंगला. राज्यातील नामवंत पैलवानांनी भाग घेतला. हलगी, डफाच्या निनादात डाव-प्रतिडाव टाकत एकमेकांना भिडलेल्या पैलवानांनी चितपट कुस्त्या करून, डोळ्यांची पारणे फेडली. केवल भिंगारे (नगर) विरुद्ध अनिल लोणारे (शेवगाव) यांच्यात तब्बल अठरा मिनिटे अंतिम कुस्तीचा थरार चालला. या चुरशीच्या लढतीत भिंगारे यांनी बाजी मरली. मानाच्या मल्हार केसरी किताबासह चांदीची गदा मिळविली. 

गावोगावची बॅंड पथके 
यात्रोत्सवात रविवारी (ता. 9) छबिना मिरवणुकीत वैजापूर, चाळीसगाव, पुणे येथील बॅंड पथके, राहुरीच्या गाडगेबाबा आश्रमशाळेतील मुलांचे झांजपथक आकर्षण ठरले. खंडोबाच्या देवळासमोर वाघ्या-मुरळीचे जागरण गोंधळ व रात्री शोभेच्या दारूच्या आतषबाजीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. महिला, बालगोपाळांनी लहान-मोठ्या पाळण्यांमध्ये बसण्याचा मनमुराद आनंद लुटला.

जत्रेचा आनंद 
महिलांनी संसारोपयोगी वस्तू व लहान मुलांनी खेळण्या खरेदी करून आनंद द्विगुणित केला. यात्रेतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर भाविकांनी मोठी गर्दी करून, विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. हजारो भाविकांनी खंडोबा मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. 

धर...धर... पकड... पकड 
काल (सोमवारी) कुस्त्यांच्या फडात शंभरावर कुस्त्या रंगल्या. नगर, पुणे, नाशिक व बीड जिल्ह्यातील नामवंत पैलवानांनी चित्रपट कुस्त्या केल्या. धर... पकड... उचल... आपट. अशा कुस्ती शौकिनांच्या उत्स्फूर्त आरोळ्या व टाळ्यांच्या गजरात अवघे मैदान दुमदुमले. मानाचा मल्हार केसरी किताब व चांदीची गदा मिळविण्यासाठी अंतिम लढत केवल भिंगारे (नगर) विरुद्ध अनिल लोणारे (शेवगाव) यांच्यात रंगली. 

अठरा मिनिटे चालली कुस्ती 
तब्बल अठरा मिनिटे दोन्ही पहिलवान एकमेकांशी झुंजले. थंड वातावरणात दोघेही घामाने नखशिखांत न्हाले. अखेर, पंचांनी दोन मिनिटांचा वेळ देऊन, पहिला गुण मिळविणाऱ्या पैलवानास विजेतेपद घोषित केले. त्यात, भिंगारे यांनी बाजी मारली. 

मान्यवरांच्या हस्ते वितरण 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप वर्पे, यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष अजित कदम, कार्याध्यक्ष अमित कदम, नगरसेवक शैलेंद्र कदम, शहाजी कदम, नानासाहेब कदम यांच्या हस्ते विजेत्या पैलवानांना बक्षीस वितरण झाले. कुस्तीच्या फडात नितीन घोलप, प्रकाश मोढे, अल्लाउद्दीन शेख व बाबाराव देशमुख यांनी पंच म्हणून काम पाहिले. गणेश हापसे व राजेंद्र चव्हाण यांनी कुस्त्यांचे समालोचन केले. 

एकाच घरात दोन गदा 
चार वर्षांपूर्वी केवल भिंगारे यांचे ज्येष्ठ बंधू पवन भिंगारे अंतिम लढतीत पराभूत झाले होते. दोन वर्षांपूर्वी केवल यांचे कनिष्ठ बंधू आकाश भिंगारे यांनी चांदीची गदा पटकावली होती. यंदा केवल यांनी गदेवर वज्रमूठ आवळली. त्यामुळे, एकाच घरात दोन चांदीच्या गदा मिळविण्याचा मान नगरच्या भिंगारे कुटुंबास मिळाला. भावाच्या पराभवाचा वचपा काढल्याची भावना कुस्तीप्रेमींमध्ये होत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhingare win malhar kesri ksuti compition