बेळगावकरांनो सायकल चालविण्यासाठी तयार रहा; लवकरच येत आहे 'ही' योजन

मल्लिकार्जुन मुगळी 
Monday, 15 June 2020

योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर काही काळानंतर महापालिकेकडे तीचे हस्तांतरण करावे लागणार आहे.

बेळगाव - महत्वाकांशी 'बायसीकल शेअरींग' योजनेचा साडेपाच कोटी रूपयांचा आराखडा स्मार्ट सिटी विभागाने तयार केला आहे. त्यानुसार बेळगाव शहरात 650 सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यातील 30 टक्के सायकली या ई-सायकली असतील तर उर्वरीत 70 टक्के सायकली नियमित सायकली असणार आहेत. शहरात 80 ठिकाणी सायकल स्टॅंड तयार केले जाणार आहेत. यासंदर्भात महापालिका व स्मार्ट सिटी विभागाची बैठक लवकरच होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर काही काळानंतर महापालिकेकडे तीचे हस्तांतरण करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, प्रशासक यांच्याशी चर्चा करून आराखडा अंतीम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. 

आधी ही योजना पीपीपी तत्वावर राबविण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी इच्छूक कंपन्यांकडून अर्जही मागविण्यात आले होते. पण त्याला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता 70 टक्के शासकीय व 30 टक्के खासगी गुंतवणूकीतून ही योजना राबविली जाणार आहे. यासाठी आवश्‍यक 70 टक्के निधी राज्याच्या परीवहन विभागाकडून दिला जावा असा प्रस्ताव स्मार्ट सिटी विभागाने मांडला आहे. परीवहन विभागाने हा प्रस्ताव मान्य केला नाही तर स्मार्ट सिटी योजनेतील शिल्लक निधीतून योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ही बायसीकल शेअरींग' योजना तयार करण्यात आली आहे. खरेदी किंवा अन्य कारणांसाठी बेळगावात येणाऱ्यांना आपल्या कामासाठी या योजनेतील सायकलींचा वापर करता येणार आहे. माफक दरात सायकल उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यात म्हैसूर शहरात ही योजना यशस्वी झाली आहे. ही योजना राबविणारे बेळगाव हे राज्यातील दुसरे शहर ठरणार आहे. बेळगाव शहरातील काही रस्त्यांवर सायकल ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. ते काम प्रगतीपथावर आहे, ते काम पूर्ण होण्याआधी या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात केली जाणार आहे. तोवर शहरात स्मार्ट सिटी योजनेतील रस्त्याची प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर होणार आहेत. 

हे पण वाचा - भाडेकरूंनी घर भाडे न दिल्याच्या रागातून मालकाने घरात जावून केला धक्कादायक प्रकार 

गतवर्षी स्मार्ट सिटी विभागाने या योजनेबाबत नागरिकांची मते मागविली होती. त्यात बहुतेकांनी या योजनेबाबत सकारात्मक मते नोंदविली आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटी विभागाने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 30 टक्के रक्कम गुंतविण्यासाठी ठेकेदार कंपनीचा शोधही सुरू केला जाणार आहे. 

हे पण वाचा - ब्रेकिंग ; कोल्हापुरात पत्नीकडून डोक्याता होतोडा घालून पतीचा खून

 

बायसीकल शेअरींग योजनेचा आराखडा तयार आहे. साडेपाच कोटी रूपयांची ही योजना आहे. महापालिका प्रशासक व आयुक्‍तांशी चर्चा करून आराखडा मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शहरात 650 सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
-शशीधर कुरेर. व्यवस्थापकीय संचालक, स्मार्ट सिटी योजना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycle Sharing Scheme start in belgaum