esakal | सांगली जिल्ह्यात सत्तांतराचा उडाला धुरळा 
sakal

बोलून बातमी शोधा

Big bash to the established in most villages of Sangali

सांगली जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आणि नवे गावकारभारी गुलालात न्हाऊन निघाले. फटाक्‍यांची आतषबाजी करत मिरवणुका काढण्यात आल्या.

सांगली जिल्ह्यात सत्तांतराचा उडाला धुरळा 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आणि नवे गावकारभारी गुलालात न्हाऊन निघाले. फटाक्‍यांची आतषबाजी करत मिरवणुका काढण्यात आल्या. गावोगावी एकच जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी सत्तांतराचा धुरळा उडाला. काही ठिकाणी मातब्बरांना धक्का देत नव्या युवकांनी गावची सत्ता काबीज केली. आता साऱ्यांच्या नजरा 24 जानेवारीला होणाऱ्या सरपंच सोडतीकडे असणार आहेत. त्यात कोणते आरक्षण निघते आणि ती जागा सत्ता मिळवणाऱ्या पॅनेलने जिंकली आहे का, की सत्ता एकाची आणि सरपंच दुसराच, असे होईल, याकडे लक्ष असणार आहे. 

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतींसाठी ग्राम-संग्राम रंगला होता. त्यात गावचा कारभार आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष झाला. वातावरण तापले होते. एकेका मतासाठी गावपातळीवर संघर्ष पेटला होता. काही ठिकाणी बड्या नेत्यांनी ताकद लावावी, असेही प्रयत्न झाले होते. काही ठिकाणी मातब्बरांना आव्हान देत गावातील तरुणाई एकवटली होती. पारंपरिक राजकारणाला फाटा देत विकासाला प्राधान्य देण्याचा मुद्दा लोकांनी डोक्‍यावर घेतला. अनेक गावांत भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरदार गाजला. गैरव्यवहारातील अनेकांना दणका देत मतदारांना जागा दाखवून दिली. 

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांच्या हिशेबाने गावच्या राजकारणात वेगवेगळी मांडणी झाली होती. अनेक ठिकाणी पक्षाला बाजूला ठेवून वेगवेगळ्या गटातील लोक एकत्र येऊन लढले. त्यांनीही परिवर्तन करून दाखवले. सकाळी आठ वाजता सदस्य आणि प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रावर बोलावण्यात आले होते. सकाळी दहापासून मतमोजणीला सुरवात झाली. बारापर्यंत बहुतांश ठिकाणचे निकाल हाती आले होते. तासगाव तालुक्‍यात राष्ट्रवादीने बाजी मारली. 36 पैकी 17 ग्रामपंचायती जिंकल्या. कवठेमहांकाळ तालुक्‍यात राष्ट्रवादीने 6, घोरपडे गटाने 2, खासदार संजय पाटील गटाने 2 ठिकाणी झेंडा फडकावला. शिराळा तालुक्‍यात राष्ट्रवादीने एक, राष्ट्रवादी भाजप एक अशी सत्ता आली. पलूस तालुक्‍यात 12 पैकी 9 ठिकाणी कॉंग्रेसने तर तीन ठिकाणी आघाडीने बाजी मारली. भाजपच्या हाती भोपळा आला. खानापूर तालुक्‍यात 13 पैकी नऊ ग्रामपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मिरज तालुक्‍यातील म्हैसाळ, मालगाव या गावांत सत्तांतर झाले. 

विजयनगर गावात जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या गटाने सत्ता अबाधित राखली. मल्लेवाडी गावात परिवर्तन झाले. एरंडोलीत मातब्बरांना धक्का देत जान्हवी पॅनेलने सत्ता कायम राखली. जत तालुक्‍यात कॉंग्रेसने 11, भाजपने 9 तर विकास आघाडीने नऊ ठिकाणी बाजी मारली. मोठ्या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. 

जल्लोषाला उधाण 
निकालानंतर मिरवणूक काढणे, गुलाल उधळणे यासाठी परवानगी घ्यावी, कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु, विजयाचा जल्लोष इतका प्रचंड होता की सारे नियम बाजूला ठेवून विजयी जल्लोष करण्यात आला. 

झेडपी अध्यक्षांचे कारभारी लई भारी 
जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या विजयनगर (ता. मिरज) या गावात जोरदार टशन होती. निवडणुकीला निकाल काय लागतोय, याकडे नजरा होत्या. तेथे 11 विरुद्ध 0 असा विरोधकांचा धुव्वा उडाला. प्राजक्ता यांचे पती नंदकुमार कोरे हेही विजयी झाले. ते गावचे कारभारी झाले. 

संपादन : युवराज यादव