esakal | मिरज पंचायत समितीत भाजपला घरचा आहेर ; दोन सदस्यांमुळे काँग्रेस उमेदवाराचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

BJP candidate lose the election of panchayat samiti congress party win seat in sangli miraj

उपसभापती पदाच्या निवडणुकीतील राजकीय डावपेचांमुळे सांगली जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय वातावरणाचे संकेत मिळाले आहेत.

मिरज पंचायत समितीत भाजपला घरचा आहेर ; दोन सदस्यांमुळे काँग्रेस उमेदवाराचा विजय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : येथील पंचायत समितीच्या उपसभापतिपदी काँग्रेसचे सदस्य अनिल आमटवणे यांची आज (बुधवारी) बहुमताने निवड झाली. त्यांना भाजपच्या सदस्या शुभांगी सावंत (मालगाव) आणि सुनिता पाटील (आरग) या दोघींनी  काँग्रेसचे उमेदवार आमटवणे यांच्या बाजूने मतदान केले. यामुळे आमटवणे यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण बंडगर यांचा केवळ एक मताने पराभव झाला. या उपसभापती पदाच्या निवडणुकीतील राजकीय डावपेचांमुळे सांगली जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय वातावरणाचे संकेत मिळाले आहेत.

मिरज पंचायत समिती मधील भाजपच्या सदस्यांमध्ये पडलेली फुट आणि उपसभापतीपदी काँग्रेसचे अनिल आमटवणे  यांची झालेली निवड ही भारतीय जनता पक्षातील अस्वस्थतेचे लक्षण समजले जात आहे. आज सकाळी ११ वाजता उपसभापती निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसापासून विरोधी काँग्रेसच्या सदस्यांचे नियोजन सुरू होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मालगाव आणि आरग येथील पंचायत समिती सदस्यांनी या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याचा निर्णय घेतल्याचे आजच्या त्यांच्या भुमिकेतून स्पष्ट झाले. 

हेही वाचा - सांगलीत पाच लाख ग्राहकांना जोर का झटका धीरेसे ; कोरोना टाळेबंदीत अनुदान गायब -

दरम्यान  या निवडणुकीतील राजकीय खेळीमुळे पंचायत समितीमधील भाजपच्या वर्चस्वास धक्का लागल्याचेही स्पष्ट झाले आहे. निवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया देताना नूतन उपसभापती अनिल आमटवणे यांनी मिरज पंचायत समितीमधील या बदलाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटलेले दिसतील. आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षास पराभूत करण्यासाठी अशाच प्रकारचे धक्कातंत्र महाआघाडीचे नेते अमलात आणतील असे सांगितले.

तर पराभूत उमेदवार किरण बंडगर यांनी शुभांगी सावंत आणि सुनिता पाटील या दोघींना भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी सभापतीपदाची संधी देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा तसेच माझा पराभव केवळ मी बहुजन समाजाचा असल्याने प्रस्थापित राजकीय नेत्यांनी केल्याचा आरोप केला.
दरम्यान मिरज पंचायत समिती मधील उपसभापती पदाची निवडणूक आणि त्यामध्ये भाजपला बसलेला धक्का यामुळे मिरज तालुक्यासह शहरातील आणि ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे नजीकच्या भविष्यकाळात वेगाने बदलण्याची चिन्हे आहेत.


हेही वाचा - सांगलीत आमराईबाबत 23 फेब्रुवारीला बैठक ; नेमका प्लॅन सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना -

संपादन - स्नेहल कदम