कोल्हापूर जिल्हा काबीज करण्यासाठी भाजपची 'ही' नवी रणनीती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp create new power in kolhapur district kolhapur marathi news

कोल्हापूर जिल्हा काबीज करण्यासाठी भाजपची 'ही' नवी रणनीती...

कोल्हापूर - जिल्हा काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. नव्या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीनंतर मरगळ आलेल्या  कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुन्या भाजप कार्यकर्त्यांबरोबरच समरजित घाटगे, धनंजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे यांच्या साथीने जिल्हा काबीज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना या तिघांना टक्कर देण्याची नवी रणनीती यानिमित्त आखली जात आहे.

कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचा प्रयत्न

राज्यातील सत्ता गमावली, त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्हीही आमदारांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते काहीसे उदासीन होते; पण या मरगळीतून कार्यकर्त्यांना बाहेर काढून रिचार्ज करण्यासाठी अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने मेळावे घेउन शक्तिप्रदर्शन केले आहे. समरजित घाटगे यांची वर्णी जिल्हाध्यक्षपदावर करुन सहकारातील स्वच्छ चेहरा यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न 
केला आहे.

वाचा - शिवरायांशी मोदींची तुलना म्हणजे शिवरायांचाच सन्मान ; भाजपच्या या नेत्याची मुक्ताफळे

त्याचबरोबर जिल्ह्यातील वजनदार नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाही यानिमित्ताने शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेची सत्ता हातातून निसटली आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या गोकुळ, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचा आदेश यानिमित्ताने कार्यकर्त्यांना दिले आहेत.  त्या तडजोड करत, नेते आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत.  ठिकठिकाणी असे बेरजेचे राजकारण करतच सत्तास्थाने मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
जिल्ह्यातील गोकुळ महत्त्वाचे सत्तास्थान आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे गोकुळची सर्व सूत्रे आहेत. एप्रिलमध्ये गोकुळची निवडणूक होणार असून, गोकुळचा गड महाडिकांकडेच राहावा, यासाठी भाजपची सर्व ताकदही महाडिकांच्या मागे लावण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी 
दिले आहेत.प्रत्येक निवडणुकीत विजयाचा चंग
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे येथे भाजप आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे दोन आमदार होते. जिल्हा परिषदेवर सत्ता होती. महापालिकेत ते विरोधी पक्षात आहेत. त्यांचे ३२ सदस्य आहेत. आता जिल्ह्यातून पक्षाचा एकही आमदार नाही. जिल्हा परिषदेत सत्ता गेली आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचा चंग यानिमित्ताने बांधला आहे.

हाळवणकर-आवाडे तडजोड घडविणार

इचलकरंजीत भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनीही भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. परंतु, हाळवणकर आणि आवाडे हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यातही तडजोड घडवून दोघांच्या साथीने भाजप मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांचे प्रयत्न आहेत. मेळाव्यातील भाषणात त्यांनी तसा दुजोरा दिला.