
Sangli Crime News : माजी नगरसेवक हत्या प्रकरणी चौघांना अटक; भाजप नेताच निघाला मुख्य सुत्रधार
सांगलीतील जत शहरातील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून अजून एकाचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.
नेमकं काय झालं?
भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची शुक्रवारी भर दिवसा गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. ताड हे त्यांच्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात होते. यावेळी सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल जवळ हल्लेखोरांनी गाडी अडवली. यावेळी पळून जात असताना ताड यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
या हत्त्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या घटनेच्या तपासासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात भाजप नेताच मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले आहे.

अखेर पोलिसांना यश
या हत्त्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने, आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण असे आहेत. तसेच या प्रकरणाचा सूत्रधार हा भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या सावंत याचा शोध घेत आहेत.