भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli

देशमुख आणि पडळकर गटाचा मानहानीकारक पराभव मानला जातो.

भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

आटपाडी : आटपाडी म्हणजे देशमुख या राजकीय समीकरणाला मोठा धक्का आजच्या जिल्हा बँकेच्या निकालाने बसला. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी अकरा मतांनी पराभव करून अनपेक्षित धक्का दिला. (Sangli District Bank Election) हा पराभव माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिव्हारी लागणारा मानला जातो. (Sangli District Bank Election) यानिमित्ताने आटपाडी तालुक्यात तानाजी पाटील यांच्या रुपाने तिसरे सत्ताकेंद्र निश्‍चित झाले असून त्यांनी सोडलेला अश्‍वमेध कोण कोण रोखणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. (DCC Bank Election)

१९९५ मध्ये माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून आमदार अनिल बाबर यांचा पराभव करून आमदारकी खेचून आणली होती. तालुक्याच्या राजकारणात अण्णांचा मोठा दबदबा आणि जनाधार होता. त्यानंतर गेली वीस वर्षे ते विधानसभेला दरवेळी कोणाला तरी पाठिंबा देत आले होते. (Sangli District Bank Election results) २०१४ मध्ये त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची तर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

हेही वाचा: Sangli Bank Election : सोसायटी गटात महाआघाडीचा षटकार

माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणीचे अध्यक्ष,आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यासह जिल्हा बँकेचे संचालक यासारखी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. गेली पंचवीस वर्षे त्यांच्या गटाकडेच जिल्हा बँकेचे संचालक पद कायम होते. दरवेळी मोठ्या मताधिक्‍याने एक तर्फे निवडून येत होते. यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांना विकास सेवा सोसायटीच्या गटातून उमेदवारी दिली होती.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यासारखी दिग्गज नेते मंडळी त्यांच्यासोबत होती. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय पाटील यांनीही समर्थन दिले होते. तर तानाजी पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि आमदार अनिल बाबर यांनी बळ दिले होते.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यात आटपाडीत मोठा राडा झाला होता. त्यामुळे निवडणुकीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दोन्ही बाजूने मतदारांना अज्ञात स्थळी हलवले होते. मतदानानंतर दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला होता मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी पाटील यांनी ४० मध्ये घेऊन अकरा मताने राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव करून साऱ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला आहे. देशमुख आणि पडळकर गटाचा मानहानीकारक पराभव मानला जातो. निकालानंतर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आटपाडी गावागावात फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा: Sangli Bank - भाजपचे महाडिक विजयी; महाविकासला मोठा धक्का

loading image
go to top