सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही.

सांगली - जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले २६ मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K फॅक्‍टर...कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव ‘के’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही ‘के’नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा ‘के’ भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम राहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. त्यात अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे ‘के’ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ॲड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो. 

खाडे यांच्या गटाकडे संधी

विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे,  असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा ‘के’ फॅक्‍टरही आलाच. हे सारेच ‘कमळ’ चिन्हावर निवडून आल्याने ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

काँग्रेसला D ‘फॅक्‍टर’चा झटका?

जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एका ‘डी’ फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची एक जागा कमी झालीच; शिवाय सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP K Factor For Sangli ZP President Election