खासदारांची पाचही बोटे तुपातच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

खासदारांची पाचही बोटे तुपातच!

तासगाव : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तासगाव तालुक्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता नसली, तरी राष्ट्रवादी अर्थात युवा नेते रोहित पाटील यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. भाजप तथा खासदार संजय पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभेसाठी त्यांनी चिरंजीव प्रभाकर यांना ‘प्रोजेक्ट’ करण्यास सुरुवात केली आहे. सत्तांतरामुळे खासदारांची पाचही बोटे आता तुपातच असतील. काँग्रेस-शिवसेनेचे ‘एकलो चलो रे’ कायमच असेल.

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विरोधी पक्षाचीच भूमिका आलेली आहे. सुरुवातीला आमदार सुमन पाटील यांना फारशी कामाची संधीच मिळाली नाही. मात्र त्यानंतर गेली अडीच वर्षे तालुक्यात राष्ट्रवादीची संपूर्ण धुरा रोहित पाटील यांच्यावर पडली असताना राज्यात ‘मविआ’ची सत्ता आल्यानंतर त्यांनी काही धोरणात्मक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात सत्ता असल्याचा परिणाम मतदारसंघात दिसतही होता. मात्र तोपर्यंत पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. याचा दूरगामी परिणाम राष्ट्रवादीवर होणार आहे. राज्य पातळीवरून होणारी कामे, मिळणारा निधी, यावर बंधने येऊ शकतात.

दुसरीकडे, तालुका आणि मतदारसंघातील मातब्बर नेते खासदार संजय पाटील यांचे मनोबल नक्कीच वाढले आहे. सत्ता कोणाचीही असली तरी खासदारांना तसा फारसा फरक पडत नाही. अगदी दिवंगत आर. आर. पाटील यांच्या काळात सुद्धा ते नेहमीच सत्ताकेंद्राजवळ राहिले आहेत. राज्यात युतीचे सरकार असताना आणि त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत ‘मविआ’चे सरकार असतानाही ते सत्ताधारी पक्षाच्या जवळ होते. माजी मंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी असलेली सलगी त्यांनी कधीच लपवून ठेवली नव्हती. दुसरीकडे, भाजपमध्ये तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत वर्तुळातील मानले जातात. त्यामुळे भाजपवर फारसा फरक पडेल, असे वाटत नाही.

सत्ता असो वा नसो, तालुक्यात काँग्रेसची भूमिका ‘एकला चलो रे’, अशी राहिली आहे. तालुक्यातील काँग्रेसचे नेते महादेव पाटील यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. काँग्रेसवर सत्तांतराचा फारसा परिणाम होणार नाही. राहिला विषय शिवसेनेचा, सेनेत फूट पडल्यानंतर आतापर्यंत तरी सगळे उद्धव ठाकरे यांच्या मागे आहेत, असे चित्र आहे. तालुक्यात शिवसेनेची ताकद तशी तोळामासा अशीच आहे. पदाधिकारी फेरबदलानंतर शिवसेनेत जान आली होती, तोपर्यंत सत्ताबदल झाला. शिवसेनेचे मतदारसंघातील नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भूमिका पाहावी लागणार आहे. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर सत्तांतर होऊन शिंदे सरकार सत्तेत आले तरी फारसा मोठा राजकीय परिणाम तासगाव तालुक्यावर होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे.

जाच आता तरी कमी होईल

सत्तांतरानंतर तरी माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचा तासगाव तालुक्यात होणारा ‘जाच’ आता तरी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आबा गटाला अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सत्तेचा वापर त्यांनी आबा गट फोडून मतदारसंघात स्वतःचा गट तयार केला. त्यामुळे राष्ट्रवादीला आता त्या बाजूने तरी थोडा दिलासा मिळेल.

पक्षीय बलाबल

जिल्हा परिषद : राष्ट्रवादी ४, भाजप २

पंचायत समिती : राष्ट्रवादी ७ ,भाजप ५

नगरपालिका : भाजप १३, राष्ट्रवादी ८

Web Title: Bjp Mp Sanjay Patil Difficulties Faced By Congress Shiv Sena Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..