भाजपची मुसंडी, शिवसेनेचीही ‘दंगल’

भाजपची मुसंडी, शिवसेनेचीही ‘दंगल’

काँग्रेसला धक्का - राष्ट्रवादीसह स्वाभिमानीची मोठी पीछेहाट; ‘ताराराणी’चीही कमाल
कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विश्‍लेषकांचे अंदाज चुकवत भाजपने जोरदार मुसंडी मारत १४ जागा पक्षाच्या चिन्हावर जिंकल्या आहेत. शिवसेनेनेही दहा जागा जिंकून चांगलीच ‘दंगल’ घडवली असून जिल्हा परिषदेतील सत्तारूढ काँग्रेसला व त्यांचा नैसर्गिक मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. 

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीनेही पाच जागा जिंकत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानी’ची मात्र मोठी पिछाडी झाली असून भाजपसोबत आघाडी केलेल्या जनसुराज्य शक्तीने प्रभाव क्षेत्रातील जागा राखण्यात यश मिळवले आहे. 

केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी, राज्य सरकारच्या कारभारावर होत असलेली टीका याचा कोणताही परिणाम या निवडणुकीवर झाला नसल्याचे निकालावरून दिसून आले. 

लोकांनी राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपसह शिवसेनेलाही भरभरून मतदान केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे उमेदवार विजयी झालेल्या गट व गणांत भाजप दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष आहे. यावरून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

नगरपालिका निवडणुकीत भाजपने जे सोबत येतील त्यांना घेतले, चिन्हाची सक्ती केली नाही. हाच ‘पॅटर्न’ भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत वापरला. त्यातून दोन्ही काँग्रेसचे दिग्गज त्यांच्या गळाला लागले. या जोडीलाच ताराराणी, जनसुराज्य शक्तीची साथ होतीच. त्यातून भाजपने जिल्ह्यात ६७ पैकी १४ जागा जिंकल्या. मावळत्या सभागृहात केवळ एक जागा असलेल्या भाजपचे हे यश लक्षणीय म्हणावे लागेल. शिवसेनेनेही गेल्या निवडणुकीप्रमाणेच या वेळीही चांगले यश मिळवले. सध्या सेनेचे पाच सदस्य होते, त्यात दुप्पट वाढ झाली आहे; मात्र सेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे आपल्या भावाचा पराभव रोखू शकले नाहीत. 

काँग्रेसला मात्र नेत्यांतील अंतर्गत मतभेदाचा मोठा फटका या वेळी बसला. गेल्या निवडणुकीत ३१ जागांवर विजय मिळवलेल्या काँग्रेसला या वेळी निम्म्याही जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेस म्हटले, की पी. एन. पाटील, सतेज पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे ही नावे पुढे येतात. या चौघांनी ठरवले असते तर एकहाती पक्षाची सत्ता आली असती; पण या चौघांच्या दिशा वेगळ्या झाल्याने मोठे अपयश पक्षाच्या वाट्याला आले. आवाडे यांनी स्वतंत्र आघाडी करून दोन जागा जिंकल्या; पण त्या सत्तास्थापनेत काँग्रेससोबत राहणार की विरोधकांकडे जाणार, हे महत्त्वाचे आहे. काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या करवीर, राधानगरी व शिरोळ तालुक्‍यात पक्षाची वाताहत झाली आहे. 

राष्ट्रवादीची तर या निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली. पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर सगळी धुरा होती; पण त्यांच्याच पक्षाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी केलेली भाजपसोबतची आघाडी, श्री. मुश्रीफ यांना कागलमध्येच अडकून ठेवण्यात विरोधकांना आलेले यश यामुळे इतर तालुक्‍यांत राष्ट्रवादीची वाट लागली.

काही वर्षांपूर्वी केवळ कोल्हापूर महापालिकेपुरती मर्यादित असलेल्या ‘ताराराणी’ची घोडदौड या वेळी लक्षणीय दिसली. ताराराणीची भाजपसोबत आघाडी होती; पण त्यांना चिन्हावर पाच जागा जिंकता आल्या.

सत्तास्थापनेत या जागा भाजपसोबत राहतील. जनसुराज्य शक्तीचे माजी मंत्री विनय कोरे यांनी आपले प्रभावक्षेत्र असलेल्या शाहूवाडी व हातकणंगले तालुक्‍यातील सहा जागा जिंकून आपली ताकद राखून ठेवली.

‘स्वाभिमानी’चा मात्र या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला असून, गेल्या वेळी आठ जागा जिंकलेल्या या पक्षाला कशाबशा दोनच जागा जिंकता आल्या. 

राष्ट्रवादीला खासदारांचाही फटका
जिल्हा परिषदेत पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याचे आश्‍वासन राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिले होते; पण श्री. मुश्रीफ यांच्याशी झालेल्या मतभेदातून ते पक्षाच्या प्रचारापासूनच दूर राहिले. चंदगड वगळता एकाही तालुक्‍यात त्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी सभा किंवा पदयात्रा घेतली नाही. संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत निवडणुकीपासूनच अलिप्त राहिलेल्या खासदारांचाही फटका राष्ट्रवादीला बसला. 

काँग्रेसचे बालेकिल्लेच ढासळले
करवीर, हातकणंगले, राधानगरी व शिरोळ हे काँग्रेसचे बालेकिल्ले होते. या चार तालुक्‍यांतून गेल्या वेळी काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. त्यात करवीरच्या आठ, हातकणंगलेच्या चार, राधानगरी, शिरोळच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश होता. या वेळी करवीरमधून केवळ चार, राधानगरीतून दोन, शिरोळमधून एक जागा मिळाली. हातकणंगले, राधानगरीतून एकही जागा मिळालेली नाही. काँग्रेसचे हे बालेकिल्लेच ढासळल्याने पक्षाची मोठी पीछेहाट झाली. 

नोटाबंदी, मराठा मोर्चाचा परिणाम नाही
या निवडणुकीवर नोटाबंदी व मराठा मोर्चाचा परिणाम होईल, असाही अंदाज वर्तवला जात होता. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली, शेतकऱ्यांसह सामान्यांचे हाल झाले. या निवडणुकीत लोक हा राग काढतील, असा अंदाज होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीही मोठा मोर्चा निघाला; पण आरक्षण मिळाले नाही. त्याचाही फटका सरकारला बसेल, अशीही शक्‍यता होती; पण या दोन्हीही मुद्यांचा निकालावर काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येते.

राहुल पाटील यांनाही विरोध शक्‍य
काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्‍चित केल्यास एकवेळ महादेवराव महाडिक पाठिंबा देतील; पण श्री. आवाडे यांना हे नाव मान्य होणार नाही. या दोघांतील मतभेद पाहता आवाडे यांच्याकडून राहुल यांच्या नावाला विरोध होईल. आवाडे-पीएन यांच्यात एखाद्या पदासाठी समझोता झाल्यास काँग्रेस आघाडी सत्तेत शक्‍य आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com