esakal | भाजपने दाखविले एकीचे बळ; महापालिकेत स्थायी समिती निवडणुकीत सत्ता अबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

 BJP showed strength of unity; Unbroken power in the Municipal Corporation

सांगली महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज स्थायी समितीसह सहा सभापतींच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बाजी मारत आपली सत्ता अबाधित असल्याचा संदेश दिला आहे.

भाजपने दाखविले एकीचे बळ; महापालिकेत स्थायी समिती निवडणुकीत सत्ता अबाधित

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज स्थायी समितीसह सहा सभापतींच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बाजी मारत आपली सत्ता अबाधित असल्याचा संदेश दिला आहे. भाजप नेते अंतर्गत नाराजी रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे चार महिन्यांनी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'ला भाजपची सत्ता पालटण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. 

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सुमारे सव्वादोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. प्रथमच स्वबळावर भाजपची महापालिकेत सत्ता आल्याने नेतेही खुशीत होते. पण, दीड वर्षातच राज्यातील सत्ता गेल्याने महापालिकेत काय होणार, याची सतत कुजबूज सुरू असते. त्यातच पुढील वर्षी फेब्रुवारीत होणारी महापौर निवड लक्षवेधी असणार आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने "राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यात लक्ष घालणार का, हा प्रश्‍न आहे. त्यांनी मनावर घेतल्यास महापालिकेत सत्तांतर होऊ शकते, अशी आघाडीच्या नगरसेवकांना खात्री आहे. 

भाजपची राज्यात सत्ता असताना महापालिकेत त्याचा प्रभाव जाणवत होता. मात्र, वरची सत्ता जाताच त्याचे परिणामही महापालिकेत दिसू लागले. घनकचरा प्रकल्पावरून पक्षांतर्गत झालेले मतभेद चांगलेच चव्हाट्यावर आले. अखेर प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांना हस्तक्षेप करून प्रकल्पच थांबविण्याची वेळ आली. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात ताळमेळ नाही. आपली कामे होत नाहीत, अशी भाजपच्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. 

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत भाजपची सत्ता राहणार की जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणून पाहिले जात असलेल्या स्थायी समितीचे सभापतिपद मिळविण्यासाठी भाजपचे सहयोगी सदस्य गजानन मगदूम यांनी कंबर कसली; तर मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला संधी मिळणार की नाही, या प्रश्‍नाने नेत्यांना घेरले. त्यामुळे मिरजेच्या पांडुरंग कोरे यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांना आनंद झाला. 

आघाडीचा डाव फसला 
मगदूम सहयोगी सदस्य असल्याने त्यांना पक्षाचा व्हीपही लागत नाही, अशी परिस्थिती होती. त्यातच आणखी एक सदस्य नाराज होते. मात्र, त्यांनी "फुटण्यास' नकार दिल्याने आघाडीचा डाव फसला. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, दिनकर पाटील, सुरेश आवटी यांनी सदस्यांना एकत्र ठेवण्याची भूमिका बजावली. त्यांची समजूत काढून नाराजी टाळण्यात यश मिळविले. पक्षाने बजावलेल्या व्हीपचाही परिणाम झाला. त्यामुळे "स्थायी'त भाजपची सत्ता अबाधित राहिली. 

आता लक्ष महापौरपदाकडे 
महापालिकेत स्थायी समितीची सत्ता राखण्याचे आव्हान होते. ते यशस्वी पार पडल्याने आता महापौरपदही राखण्याचा विश्‍वास भाजप नेत्यांना आहे. या निवडीतच महापौरपदाचेही बीज कटाक्षाने पेरले गेले. जे गट फुटण्याची शक्‍यता आहे, ते लक्षात घेऊन सर्व गटांना सांभाळण्याचे काम भाजप नेत्यांनी केले. त्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या महापौरपदावेळीही भाजपचे पारडे वरचढ राहण्याचीच चिन्हे आहेत. 

यापुढे निष्ठावंतांना संधी 
भाजपच्या पहिल्या सव्वादोन वर्षांच्या काळात निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी दिली आहे. आता तरी निष्ठावंतांना संधी मिळावी, अशी मागणी सतत सुरू होती. त्यानुसार आता पांडुरंग कोरे यांना स्थायी सभापतिपदी संधी देऊन भाजपने सुरवात केली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात महत्त्वाच्या पदांवर पक्षाच्या निष्ठावंतांना संधी मिळेल, अशी आशा आहे. 

संपादन : युवराज यादव