esakal | घनकचऱ्यावरुन भाजपमध्ये फूट: महासभेबाबत नेत्यांचा आदेश मानू : महापौर

बोलून बातमी शोधा

BJP splits over solid waste: Obey leaders' orders regarding general assembly: Mayor

घनकचऱ्यावरुन भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार, आमदारांसह कोअर कमिटी नेत्यांशी चर्चा झाली असून विशेष महासभेचा निर्णय भाजप नेत्यांच्या आदेशानुसार होईल, असे महापौर गीता सुतार यांनी स्पष्ट केले. 

घनकचऱ्यावरुन भाजपमध्ये फूट: महासभेबाबत नेत्यांचा आदेश मानू : महापौर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : घनकचरा प्रकल्पाबाबत भाजपच्या तीन महिला नगरसेविकांनी विशेष महासभा घेण्याची मागणी महापौर गीता सुतार यांच्याकडे केली आहे. भाजपचे आणखी काही सदस्यही त्यासाठी पत्र देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे घनकचऱ्यावरुन भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार, आमदारांसह कोअर कमिटी नेत्यांशी चर्चा झाली असून विशेष महासभेचा निर्णय भाजप नेत्यांच्या आदेशानुसार होईल, असे महापौर गीता सुतार यांनी स्पष्ट केले. 

महापौर सौ. सुतार म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. स्थायी समितीच्या चार जूनरोजी होणाऱ्या सभेसमोर हा विषय मंजुरीसाठी ठेवला आहे. परंतु नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना या प्रकल्प, आराखड्याबाबत काहीच माहीती नाही. हा प्रकल्प पारदर्शीपणे राबवला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. त्या म्हणाल्या, या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांसह कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांनी विशेष महासभा घेण्याची मागणी केली आहे. त्या सभेत याबाबत माहिती द्यावी. त्यातील त्रुटींसह उणिवांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

सोबतच भाजपच्या नगरसेविका, प्रभाग समिती एक सदस्या उर्मिला बेलवलकर, महिला बालकल्याण समिती सभापती नसिमा नाईक, नगरसेविका अपर्णा कदम यांनीही हा विषय महासभेत घेऊन निर्णय करण्याची मागणी केली आहे. 

त्या म्हणाल्या, निविदा प्रक्रिया भले स्थायी समितीचा अधिकार असेल. पण अद्याप प्रकल्पच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना माहीत नाही. शिवाय आराखडा 60 कोटींऐवजी 72 कोटी रुपयांवर कसा गेला? यासह अनेक विषयांबाबत सर्वांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे विशेष महासभेत चर्चा झाल्यानंतर निर्णयानंतर निविदा प्रक्रिया राबवावी, अशी सर्वांची मागणी आहे. 

याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह कोअर कमिटीच्या सर्वच नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी लवकरच याबाबत निर्णय देऊ असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसारच विशेष महासभेबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात 
घनकचरा प्रकल्पावरुन कॉंग्रेस आक्रमक झाली असताना आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीते अद्याप पाठिंब्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आघाडीत मतभेद आहेत असे दिसत आहे. त्यातच सत्ताधारी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांसह तीन नगरसेविकांनी कॉंग्रेसच्या मागणीला बळ दिले आहे.