esakal | चंद्रकांतदादांच्या टोचण्यांनी तरी कारभार सुधारणार का?

बोलून बातमी शोधा

 BJP state president Chandrakant patil taken review of municipal carporation workings

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी सांगलीत शुक्रवारी दिवसभर वेळ देऊन महापालिकेच्या कारभाराबाबत आढावा घेतला. पण यामध्ये त्यांना कामापेक्षा कुरबुरीच जादा असल्याचे लक्षात आले.

चंद्रकांतदादांच्या टोचण्यांनी तरी कारभार सुधारणार का?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी सांगलीत शुक्रवारी दिवसभर वेळ देऊन महापालिकेच्या कारभाराबाबत आढावा घेतला. पण यामध्ये त्यांना कामापेक्षा कुरबुरीच जादा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी "कारभारात सुधारणा करा, सर्वांना विश्‍वासात घेऊन कामे करा' असा सबुरीवजा सल्ला देत कारभाऱ्यांचे चांगलेच कान उपटले आहेत. मात्र यानंतर तरी भाजप कारभारात सुधारणा करणार का? हा प्रश्‍न आहे.

महापालिकेत प्रथमच भाजपने स्वबळावर सत्ता हस्तगत केली. त्याला आता दीड वर्षं झाली आहेत. पारदर्शक कारभाराचे आश्‍वासन देत भाजपने पहिल्यांदाच आपला महापौर बसवला. राज्यातही सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून महापालिकेचा विकास करणार, त्यासाठी महापालिकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना केली. यामध्ये तीन आमदार, खासदार पदाधिकारी यांचा समावेश केला. यामुळे महापालिकेच्या कारभारात काही फरक पडेल असे वाटत होते. त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत सत्ता आणल्याचे बक्षीस म्हणून नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपयांचा निधीही दिला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच जनतेमध्येही उत्साह होता. 

प्रत्यक्षात गेल्या दीड वर्षात कारभारात कोणताही मोठा फरक दिसत नाही. शंभर कोटींचा निधी मिळण्यास आठ महिने लागले. तर त्यातील कामे सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडला. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांचीही पूर्तता करण्यात भाजपच्या सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. अजूनही पाणी योजनेची कामे, ड्रेनेज योजनेची कामे अपूर्णच आहेत. आरोग्य व्यवस्थेची वाट लागली आहे. सुधारणेस भरपूर वाव असला तरी त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यातच सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत कुरबुरींमुळेही कारभारावर परिणाम होत आहे.

नगरसेवक कारभाऱ्यांच्या मनमानीपणावर नाराज होतेच. खासगीत त्यांची नाराजी समोर येते. पण, माजी उपमहौर धीरज सूर्यवंशी यांनी उघडपणे स्थायीच्या काही निर्णयांवर आक्षेप घेतला. तसेच आता त्यांच्या स्वत:च्या प्रभागातील कामे मंजूर असूनही ती सुरू करण्यासाठी उपोषणाचा इशारा द्यावा लागला. अशीच अवस्था भाजपच्या सदस्यांची झाली आहे. त्यामुळेच काल संधी मिळताच त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांसमोर ही व्यथा मांडली. 

महापालिकेचा कारभार तिघेच नेते चालवतात. ते स्वत:च्या प्रभागातच विकास कामांना निधी देतात. निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. विश्‍वासात घेतले जात नाही अशा तक्रारींचा पाढाच वाचला. त्यातच महापौर निवडीवेळची नाराजीही याच कारणातून घडली. 

गेल्या दीड वर्षातील कारभाराचा लेखा जोखा फारसा समाधानकारक नाही. ज्या उत्साहाने सत्तेत आले होते तो पहिल्या महापौरपदाच्या काळातच मावळल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत: चंद्रकांतदादांनीच कान टोचल्याने आता तरी भाजपची कोअर कमिटी आणि महापालिकेतील कारभारी एकदिलाने काम करतील अशी अपेक्षा आहे. 

कोअर कमिटीवरच अविश्‍वास हा धक्काच 
भाजपच्या नगरसेवक, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीच कोअर कमिटीवर अविश्‍वास दाखवला याची दखल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी तातडीने घेतली. महापालिकेचा कारभार पारदर्शी होण्याच्या दृष्टीने नेमलेल्या कोअर कमिटीतील दोन-तीन सदस्यांवर हस्तक्षेपाचे आणि मनमानी कारभाराचे आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे चंद्रकांतदादांनी कोअर कमिटीतील काही सदस्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. कोअर कमिटीतील काही सदस्यही या कारभारावर नाराज आहेत. 

वेळ गेली नाही, कारभार सुधारा 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी गेल्या दीड वर्षातील कारभारावर नाराजी व्यक्त करत, वेळ गेली नाही अजून साडेतीन वर्षे आहेत. कारभार सुधारा असा स्पष्ट इशारा पदाधिकारी, कोअर कमिटीला दिला आहे. तसेच सर्वांशी समन्वयाने, विश्‍वासात घेऊन निर्णय घ्या, केवळ एक दोघेच निर्णय घेतात असे चित्र दिसू नये असेही सुनावले.