विधानसभेसाठी भाजप इच्छुकांनाे... हाजिर व्हा !

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 25 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मंगळवारी (ता. 27) ठरणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर मुलाखती घेणार आहेत. त्यात कुणीही शक्तीप्रदर्शन करत मुलाखतीस येऊ नये, व्यक्तिगत चर्चा होईल, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

सांगली : विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मंगळवारी (ता. 27) ठरणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर मुलाखती घेणार आहेत. त्यात कुणीही शक्तीप्रदर्शन करत मुलाखतीस येऊ नये, व्यक्तिगत चर्चा होईल, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख आणि शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी ही माहिती दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गणेशोत्सवानंतर कुठल्याही क्षणी लागेल, असे सांगितले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरु केली असून, सर्वच्या सर्व जागा लढवायच्या आहेत, अशी पद्धतीने तयार रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिराळा, इस्लामपूर, पलूस-कडेगाव, सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर आणि जत या आठही मतदार संघातून इच्छुकांना पाचारण करण्यात आले आहेत. भाजप-शिवसेना युतीत जागा वाटपांचा विचार न करता यावेळी इच्छुक समोर येतील. त्यामुळे कुणाकुणाच्या मनात सुप्त इच्छा आहे, ती मंगळवारी उघड होणार आहे.

संभाजी पाटील निलंगेकर आधी महापुराने झालेल्या नुकसानीचा आणि त्यानंतरच्या मदत कार्याचा आढावा घेतली. त्यानंतर भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पूरस्थितीबाबत चर्चा करतील. ही बैठक खरे सांस्कृतिक भवन, विश्रामबाग येथे सकाळी 12.30 वाजता होईल. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान वसंत बंगला येथे भाजपाकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी वैयक्तिक चर्चा दुपारी 2 नंतर होईल. विधानसभेसाठी इच्छुकांनी बैठकीच्या पूर्वव्यवस्थेसाठी शहर संघटन सरचिटणीस शरद नलवडे, जिल्हा संघटन सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांच्याशी संपर्ख साधावा, असे आवाहन केले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP takes interview for assembly election in Sangli