भाजपचे लक्ष्य आता मिनी मंत्रालय

विकास कांबळे - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - नगरपालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपचे आता जिल्हा परिषद टार्गेट असणार आहे. स्थानिक पातळ्यांवरील आघाड्या करण्याचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद निवडणुकीतही असणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी स्टेशन रोडवरील गर्दी बिंदू चौक सबजेलच्या रस्त्यावर दिसू लागली तर त्यात आश्‍चर्य वाटणार नाही.
कोल्हापूर जिल्हा म्हणण्यापेक्षा पश्‍चिम महाराष्ट्राचा पट्टा हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

कोल्हापूर - नगरपालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपचे आता जिल्हा परिषद टार्गेट असणार आहे. स्थानिक पातळ्यांवरील आघाड्या करण्याचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद निवडणुकीतही असणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी स्टेशन रोडवरील गर्दी बिंदू चौक सबजेलच्या रस्त्यावर दिसू लागली तर त्यात आश्‍चर्य वाटणार नाही.
कोल्हापूर जिल्हा म्हणण्यापेक्षा पश्‍चिम महाराष्ट्राचा पट्टा हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

कोल्हापूरच्या बाबतीत सांगायचे झाले तर हा जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र राष्ट्रवादीचा हा गड हळूहळू ढासळू लागला. त्यासाठी विरोधकांना काहीच करावे लागले नाही. अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका सोसावा लागला.
राष्ट्रवादीची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे कॉंग्रेस एकसंध असताना या पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जर उमेदवारी मिळाली नाही तर शिवसेनेकडे जायचे. शिवसेना त्यांना आपली वाटायची; पण भारतीय जनता पक्षाकडे ते जायचे नाहीत. हे चित्र मात्र बदलण्यात भाजपचे नेते यशस्वी होऊ लागले आहेत. दोन्ही कॉंग्रेसमधील गटबाजीचा फायदा उचलण्याचे धोरण भाजपने राज्यात सत्तेवर आल्यानंतर स्वीकारले. त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर आघाड्या करण्याचे धोरण अवलंबले. त्याची सुरवात त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीपासून केली. त्यांनी स्थानिक पातळीवरील ताराराणी आघाडी केली. सत्ता मिळविण्यात जरी अपयश आले तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्यांनी स्थान पटकाविले. महापालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आपला मोर्चा सहकाराकडे वळविला. ग्रामीण भागात कमळ पोचवायचे असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील प्रबळ गटांशी हातमिळविणी केली. सहकारात प्रभाव असणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना थेट पक्षात आणण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजपने या निवडणुकीची तयारी सुरू केली होतीच; पण त्यापूर्वीच नगरपालिका निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजपने स्थानिक पातळीवर आघाड्यांसदर्भात चर्चा सुरू केली. भाजप-शिवसेनेची राज्यात युती आहे. नगरपालिकांतही युती झाली; पण ही युती होत असताना दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना थोडी सवलतही दिली होती. जनसुराज्य पक्षाशी युती केल्यामुळे पन्हाळा व शाहूवाडी येथे "कमळा'ला संधी मिळाली. जयसिंगपूरमध्ये ताराराणी आघाडीसोबत निवडणूक लढविली. वडगावमध्ये स्थानिक युवक क्रांती आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर आघाड्या केल्यामुळे जिल्ह्यात कमळ चांगलेच फुलले. आता महिनाभरात जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. नगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश पाहून कार्यकर्त्यांमध्ये साहजिकच चैतन्याचे वातावरण आहे. या निवडणुकीनंतर भाजपचे आता जिल्हा परिषद टार्गेट असणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीने निर्माण झालेली कमळाची हवा जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलीच जोरात वाहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आता वाढण्याची शक्‍यता आहे.

दोन्ही कॉंग्रेसची होणार दमछाक
नगरपालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे काही कार्यकर्त्यांना पक्षात घेतले त्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा सुरू झाल्यानंतर काही कार्यकर्ते प्रवेश करतील, अशी अपेक्षा आहे. नगरपालिका निवडणुकीतील हा फॉर्म्युला यशस्वी झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतदेखील भाजप हाच फॉर्म्युला वापरण्याची शक्‍यता असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची हवा रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP targets Mini Ministry