आघाडीचे गणित फिसकटले; सांगलीत महापालिकेत सत्ता राखणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

महापौर, उपमहापौरपद निवडीत मॅजिक फिगर गाठण्याचा दावा करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गणित शेवटच्या क्षणी फिसकटले. भाजप नेत्यांनी नाराजांचे मन वळवण्यात यश मिळवले आहे.

सांगली : महापौर, उपमहापौरपद निवडीत मॅजिक फिगर गाठण्याचा दावा करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गणित शेवटच्या क्षणी फिसकटले. भाजप नेत्यांनी नाराजांचे मन वळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे महापालिकेची सत्ता राखण्यात भाजपला यश आल्याचे स्पष्ट होत असून महापौरपदी गीता सुतार, तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या निवड सभेत आघाडी लढणार की माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करणार याची उत्सुकता आहे.

महापौर-उपमहापौरपदासाठी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता विशेष सभा आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. भाजपमध्ये उमेदवारीवरुन नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी या निवडणुकीत चमत्कार घडवून मॅजिक फिगर गाठण्याचा दावा करत होती; मात्र आज सायंकाळपर्यंत भाजपच्या नेत्यांना नाराजांचे मन वळवण्यात यश आले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोअर कमिटीने महापौर पदासाठी प्रभाग 17 च्या नगरसेविका गीता सुतार व मिरजेतील आनंदा देवमाने यांना उपमहापौरपदी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. कॉंग्रेस आघाडीकडून महापौरपदासाठी वर्षा निंबाळकर व मालन हुलवान तर उपमहापौरपदासाठी योगेंद्र थोरात व मनोज सरगर यांची उमेदवारी दाखल करुन भाजपसमोर आव्हान उभे केले होते. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून सदस्यांना गोवा सहलीवर पाठवले; परंतू दहा नाराज सदस्य शहरातच राहिल्याने धाकधुक वाढली होती. याचवेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उत्तम साखळकर आणि मैनुद्दीन बागवान यांनी गोव्याला गेलेलेही भाजपचे काही सदस्य संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि युवा नेते सुयोग सुतार यांनी उर्वरित सदस्यांची नाराजी दूर करुन त्यांना एकत्र आणले.

गोव्याला गेलेले 35 जण आज सायंकाळी कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून सांगलीतून उरलेले सदस्यही कोल्हापूरला गेले आहेत. असे 45 सदस्य उद्या (शुक्रवारी) कोल्हापूरमधून थेट महासभेतच आणण्यात येणार आहेत. फोडाफोडी आणि दगा फटका टाळण्यासाठी भाजपच्या सदस्यांचे मोबाईलही जमा करून घेतल्याचे समजते. 

आणि मोहिम थंडावली! 
नेत्यांचा थंड प्रतिसाद आणि संख्याबळाचे गणित जमत नसल्याने कॉंग्रेस आघाडीने आज दुपारपासून फोडाफोडीची मोहीम थांबवली. साखळकर व बागवान यांनी तसे संकेतही स्पष्टपणे दिले. त्यामुळे आघाडीचे गणित फसल्याचे स्पष्ट झाले. आता उद्याच्या सभेत निवडणूक लढवायची की माघार घेऊन भाजपला बिनविरोधची संधी द्यायची याचा निर्णय व्हायचा आहे. 

भाजप बिनविरोधसाठी प्रयत्नशील 
भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भेट घेऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेऊन निवड बिनविरोध करावी, यासाठी आग्रह केल्याचे सांगितले होते. नाराजांचे मन वळवल्यानंतर आता भाजप नेत्यांनी आघाडीने विकासकामासाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp will retain in power at Sangli Municipal corporation