स्थायी सभापतीसाठी भाजपचे घोडे कुपवाड, की मिरजवर अडले 

बलराज पवार 
Monday, 12 October 2020

महापालिकेच्या स्थायी समितीसह सात समित्यांच्या सभापती निवडीसाठी उद्या (ता. 12) अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सगळ्यांचे लक्ष लागलेल्या स्थायी समिती सभापतीसाठी सत्ताधारी भाजपचे घोडे कुपवाड, की मिरजला संधी यावर अडले आहे.

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीसह सात समित्यांच्या सभापती निवडीसाठी उद्या (ता. 12) अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सगळ्यांचे लक्ष लागलेल्या स्थायी समिती सभापतीसाठी सत्ताधारी भाजपचे घोडे कुपवाड, की मिरजला संधी यावर अडले आहे. गजानन मगदूम आणि पांडुरंग कोरे यांच्यात या पदासाठी चुरस सुरु आहे. 

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, महापालिका नेते शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी यांच्यात सातही समित्यांच्या सभापतीपदासाठी आज दिवसभर खल सुरु होता. अखेरीस सर्व समित्यांच्या इच्छूकांची नावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळवली. ते सोमवारी सकाळी नावे निश्‍चित करुन आमदार सुधीर गाडगीळ यांना कळवणार आहेत. त्यानंतर अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. 

स्थायीसह समाजकल्याण आणि महिला बालकल्याण समिती तसेच चार प्रभाग समित्यांच्या सभापती निवडी बुधवारी ऑनलाईन महासभेत होणार आहेत. त्यासाठी उद्या (ता. 12) सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक तिजोरी असलेल्या स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच आहे. यासाठी सत्ताधारी भाजपकडून गजानन मगदूम, पांडुरंग कोरे यांची नावे निश्‍चित झाली आहेत. त्यातील एका नावावर शिक्कामोर्तब उद्या होईल. मगदूम अपक्ष नगरसेवक असून ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना यंदा शेवटची संधी असल्याने त्यांनी सभापतीपदासाठी इर्षेने शड्डू ठोकला आहे. 

कुपवाडला आजवर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाची संधी मिळालेली नाही. तर भाजपचे निष्ठावंत म्हणून मिरजेचे पांडुरंग कोरे यांना दुसऱ्यांदा समितीत संधी दिली आहे. या दोघांच्या समर्थक आणि नेत्यांनी सभापतीपदी बसवण्यासाठी कंबर कसली आहे. मगदूम अपक्ष असल्याने त्यांना संधी न दिल्यास फुटीच्या राजकारणाचे नाट्य रंगू शकते. त्याचा थेट भाजपच्या सत्तेला धोका असल्याने भाजप नेते सावध निर्णय घेण्याच्या पवित्र्यात आहेत. 

मगदूमांकडे विरोधकांचे लक्ष 
गजानन मगदूम यांच्या उमेदवारीवर विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची व्यूहरचना ठरणार आहे. मगदूम यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यास पुढे नाट्य घडू शकते. त्यामुळे आघाडीचे नेते भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आघाडीतून कॉंग्रेसचे मंगेश चव्हाण तर राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी एक नाव निश्‍चित करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते व स्थायीच्या सात सदस्यांची सोमवारी सकाळी बैठक होणार आहे. 

इतर समित्यांसाठीही चुरस 
समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी सलग सहाव्यांदा भाजपच्या स्नेहल सावंत इच्छूक आहेत. पक्षाने संधी दिली नाही तर आघाडीकडून उमदेवारी घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. महिला बालकल्याण समितीसाठी नसिमा नाईक, अपर्णा कदम यांची नावे चर्चेत आहेत. प्रभाग समिती एक, दोन व चारमध्ये भाजपचे बहुमत आहे. प्रभाग समिती एकसाठी गजानन मगदूम, नसिम शेख, दोनसाठी संजय कुलकर्णी, चारसाठी शांता जाधव, गायत्री कुल्लोळी, अस्मिता सरगर यांची नावे चर्चेत आहेत. प्रभाग समिती तीनमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत आहे. तेथे रईसा रंगरेज यांचे नाव चर्चेत आहे. 

सभापतीपद कुपवाडला द्या 
कुपवाड : महापालिका स्थायी समितीचे सभापतीपद कुपवाडला देण्याची मागणी जोर धरत आहे. भाजपकडून सहयोगी नगरसेवक गजानन मगदूम, राजेंद्र कुंभार हे दोघे इच्छूक आहेत. दोघांनीही नेत्यांकडे जोर लावला आहे. अपक्ष निवडून आलेले नगरसेवक गजानन मगदूम यांनी भाजपास पाठिंबा दिल्याने कुपवाडला बळ मिळाले. त्यामुळे मगदूम यांना स्थायी सभापती पदाची संधी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's horses for permanent chairman Kupwad, or Miraj