सांगली महापालिका स्थायी सभापतीपदी भाजपचे पांडुरंग कोरे विजयी... ऑनलाईन निवडणूक

बलराज पवार
Wednesday, 14 October 2020

सांगली-  सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे पांडुरंग कोरे यांची निवड झाली. ऑनलाईन पध्दतीने झालेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचा 9 विरुध्द 7 मतांनी पराभव केला.

सांगली-  सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे पांडुरंग कोरे यांची निवड झाली. ऑनलाईन पध्दतीने झालेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचा 9 विरुध्द 7 मतांनी पराभव केला.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक यावेळी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. स्थायी समितीमध्ये भाजपची सत्ता असली तरी त्यांचे नऊ सदस्य आहेत. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सात सदस्य आहेत. भाजपकडे एक सदस्य गजानन मगदूम हे अपक्ष आहेत. मात्र ते भाजपचे सहयोगी सदस्य आहे. त्यांनी स्थायी सभापतीपदी दावा सांगितला होता. मात्र पक्षाने त्यांना डावलून मिरजेचे पांडुरंग कोरे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ते नाराज होते. त्यांच्यासह आणखी नाराज सदस्यांना गळाला लावून स्थायी समितीचे सभापतीपद पटकावण्याचा प्रयत्न विरोधी कॉंग्रेस आघाडीने चालवला होता. मात्र भाजपने सावधपणे खेळी करत सर्व सदस्यांना एकत्र ठेवले. 

आज सकाळी ऑनलाईन निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. दोन्ही उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी पाच मिनिटांची मुदत देण्यात आली होती. मात्र दोघांनीही अर्ज कायम ठेवल्याने ऑनलाईन मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या सर्व नऊ सदस्यांनी उमेदवार पांडुरंग कोरे यांना मतदान केले. तर कॉंग्रेस आघाडीचे सात मते मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यामुळे श्री. कोरे अपेक्षेप्रमाणे दोन मतांनी विजयी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's Pandurang Kore wins as Sangli Municipal Corporation's standing chairman