ब्लॅक डायमंड गॅंगचा नजन ठार, घात की अपघात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी अपघाती मृत्यूची तसेच त्याच्याजवळ हत्यारे सापडल्याने त्याच्यावर आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत

शेवगाव : येथील साई आनंद गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर आज पहाटेच्या वेळी दुचाकीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. मनोज विष्णू नजन (वय-32 रा. श्रीकृष्ण नगर आखेगाव रोड शेवगाव) असे मृताचे नाव आहे. मृताशेजारी एक गावठी कट्टा, धारदार कुकरी, गांज्या, मोबाईल व इतर साहित्य आढळल्याने हा अपघात की घातपात या बाबत शंका उपस्थित होत आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूच्या रस्त्याने मनोज नजन हा बिगर नंबरची दुचाकी (बुलेट)वरून पंचायत समितीकडून आखेगाव रोडकडे जात होता. त्याच वेळी साई आनंद गॅंस एजन्सीच्या कार्यालयासमोर आज (गुरुवारी) पहाटे 2.30 च्या दरम्यान दुचाकीचा अपघात होवून त्याच्या डोक्‍याला जबर मार लागला. 
या वेळी अपघाताच्या आवाज झाल्याने शेजारील नागरीक जागे झाले. संतोष यादव भूमकर (वय 27 राहणार शास्त्रीनगर) याने शेवगाव पोलीस ठाण्याला खबर दिली. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस सुधाकर दराडे, पो.कॉं. वासुदेव ढमाळे, प्रविण बागुल, सचिन हाडके, संभाजी धायतडक हे तातडीने घटनास्थळी आले. 

यावेळी 108 रुग्णवाहिका व ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहीका उपलब्ध नव्हती. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून त्यास टॅंक्‍टरमधून ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तेथे डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. मनोज नजनजवळ एक गावठी कट्टा, दीड फुट लांबीची कुकरी, गांजा, मोबाईल व इतर साहीत्य आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहे. त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून या घटनेवर प्रकाश पडू शकतो. त्यादृष्टीने पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यूची तसेच त्याच्याजवळ हत्यारे सापडल्याने त्याच्यावर आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत. 

शेवगाव परिसरात काही दिवसापूर्वी रस्तालूट व दरोडेखोरी करणाऱ्या ब्लॅक डायमंड टोळीची गुन्हेगारी क्षेत्रात मोठी दहशत होती. त्याच टोळीत नजनचा सहभाग होता. तसेच काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेतील एका कर्मचाऱ्याच्या डोक्‍याला गावठी कट्टा लावून धमकावण्याचा प्रकारही त्याच्याकडून घडला होता. एवढया रात्री तो बाहेर कुठे गेला होता, याची चर्चा सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Diamond gang member killed