शिवप्रभूंच्या आशीर्वादाने राजे झाले आमदार आता पुढचं मिशन नामदार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. ज्या भागात दाेन- तीन वेळा लाेकप्रतिनिधी निवडून आले आहेत. त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना आपले नेते मंत्री व्हावेत असे मनाेमन वाटत आहेत. समाजमाध्यमातून कार्यकर्ते आपली भावना व्यक्त करु लागले आहेत.

सातारा : विधानसभा निवडणुकीत युतीचे चार आमदार जिल्ह्यात निवडून आले. यामध्ये भाजपमधून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे आणि शिवसेनेतून शंभूराज देसाई, महेश शिंदे यांना यश मिळाले, तर आता सुरू झालेल्या मंत्रिमंडळातील सहभागाच्या शर्यतीत नवनिर्वाचित श्री. शिंदे वगळता उर्वरित तिघांनाही संधी मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
 
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसोबत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्याला खिंडार पाडत महायुतीने चार आमदार मिळविले. यामध्ये भाजपचे दोन आणि शिवसेनेला विद्यमान आमदारांसह नवीन आमदार मिळविण्यात यश मिळाले. पश्‍चिम महाराष्ट्रात साताऱ्यात पहिल्यांदाच यश मिळाले आहे. हे यश साजरे करताना जिल्ह्याच्या पदरात फुल ना फुलाची पाकळी पडणार हे अपेक्षित आहे. त्याला कारणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात दिलेला शब्द आहे.

म्हसवडच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरेंना विजयी करा, त्यांना मंत्रिपद देतो, असे जाहीर वचन माणच्या जनतेला दिले होते. मुख्यमंत्र्यांचे ते म्हणणे जनतेने ऐकले. आता मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा शब्द कसा पाळतात हे पाहायची वेळ आहे, तर दुसरीकडे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. राजघराण्याचा योग्य मान भाजपकडून राखला जाईल, असे मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनही स्पष्ट केले होते. त्यानुसार भाजपकडून शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिपद देण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी यापूर्वी विधानसभेचे तालिकाध्यक्ष म्हणून काम केले आहे, तसेच त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविले आहे. मागील वेळीच पाटणच्या जनतेने त्यांना पालकमंत्री करावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे जनतेच्या मागणीचा विचार करून या वेळेस युतीच्या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई यांना स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. 

विकासाला हातभार 

माणच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरे यांच्यासाठी तसा शब्द दिला होता, तर छत्रपती घराण्याचा मान राखण्याच्या विचारातून शिवेंद्रसिंहराजेंना संधी आणि शंभूराज देसाईंना जिल्ह्याचेच पालकत्व मंत्रीपदातून मिळावे, अशी पाटणच्या जनतेतून होणारी मागणी यामुळे नव्या मंत्रिमंडळात तिघांना संधी देण्याबाबत विचार होण्याची शक्‍यता आहे. एकाच वेळी साताऱ्यात तीन मंत्रीपदे देऊन साताऱ्यात भाजप, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देताना जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी प्रयत्न अपेक्षित असल्याने सर्वांचे लक्ष नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेकडे लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the blessings of Shiv Prabhu our king became MLA