बेळगाव : पाणीटंचाईच्या विरोधात बेळगावात महिलांचा रास्ता रोको

बॉक्साईट रोडवरील बसव कॉलनीतील महिला रस्त्यावर उतरल्या
 women against water scarcity
women against water scarcitysakal

बेळगाव : पाणीटंचाईच्या विरोधात गुरूवारी (ता.३१) बॉक्साईट रोडवरील बसव कॉलनीतील महिला रस्त्यावर उतरल्या. महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले, एल ॲन्ड टी कंपनीच्या विरोधात शंखनादही केला. एका तासाहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होते. रिकाम्या घागरी ठेवून व दुचाकी वाहने लावून बॉक्साईट रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे आंदोलन मागे घेईपर्यंत बॉक्साईट रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनाची दखल एल ॲन्ड टी कंपनीला घ्यावी लागली. कंपनीचे प्रतिनिधी आंदोलक महिलांच्या भेटीसाठी बॉक्साईट रोडवर गेले. त्यावेळी महिलांना त्याना घेराव घातला व प्रश्‍नांची सरबत्ती केली. गेल्या दोन आठवड्यांपासून बसव कॉलनीत पाणीपुरवठा झालेला नाही. पाण्याशिवाय रहिवाशांनी जगायचे कसे? असा सवाल त्याना करण्यात आला. पाण्याचे बिल कंपनीकडून वसूल केले जाते, मग पाणीपुरवठा का केला जात नाही? असा सवालही करण्यात आला.

या आंदोलनावेळी महिलांनी एल ॲन्ड टी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या महिलांच्या समर्थनार्थ बसव कॉलनीतल अन्य रहिवाशीही रस्त्यावर उतरले. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली. बॉक्साईट रोड अत्यंत वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. आंदोलन सुरू झाल्यानंतर बॉक्साईट रोडवरून जाणाऱ्या वाहनांना रोखून धरण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. काही वाहन चालकांनी पर्यायी मार्ग निवडला, काहीना आंदोलन मागे घेतले जाईपर्यंत तेथेच थांबून रहावे लागले. बेळगाव शहराचा पाणीपुरवठा एल ॲन्ड टी कंपनीकडे हस्तांतरीत झाल्यापासून पाणीटंचाईची समस्या वारंवार उद्भवत आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, बसव कॉलनीत पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे येथील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जावा अशी मागणी यावेळी आंदोलक महिलांनी केली. चोविस तास पाणीपुरवठा केला जात असल्याचे कंपनीकडून सांगीतले जाते, पण प्रत्यक्षात चोविस तास पाणी मिळत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. पाणीटंचाईची समस्या उद्भवल्यानंतर तक्रार कोणाकडे करावी याची माहिती नाही.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर ते फोन घेत नाहीत, शिवाय पाणी सोडण्याचे वेळापत्रकही निश्‍चित नाही अशी तक्रार तेथील एका रहिवाशांने केली. आंदोलनाचे गांभिर्य लक्षात घेवून सहाय्यक पोलिस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यानी तेथे भेट दिली. आमदार अनिल बेनके कंपनीच्या अधिकाऱ्याना घेवून आंदोलनस्थळी गेले, पण कंपनीच्या अधिकाऱ्यानी थातूर-मातूर उत्तरे दिल्याने आंदोलक महिला संतापल्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कंपनीला एक आठवड्याची मुदत दिली आहे. आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर कंपनीच्या अधिकाऱ्याना झाडाला बांधून घालून चोप दिला जाईल असे आमदार बेनके यानी सांगीतले. शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com