esakal | या जिल्ह्यात औषधांची टंचाई...
sakal

बोलून बातमी शोधा

Blood pressure, diabetes, brain disorders medicine stock low Sangali District

"कोरोना'च्या संकटामुळे ठप्प झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे सांगली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औषधांची टंचाई जाणवू लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, मेंदूविकार, मानसोपचार, कर्करोग, यासह अन्य विकारांच्या औषधांचाही साठा आता दिवसागणिक कमी होऊ लागला आहे.

या जिल्ह्यात औषधांची टंचाई...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज: "कोरोना'च्या संकटामुळे ठप्प झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे सांगली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औषधांची टंचाई जाणवू लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, मेंदूविकार, मानसोपचार, कर्करोग, यासह अन्य विकारांच्या औषधांचाही साठा आता दिवसागणिक कमी होऊ लागला आहे. काही औषधे तर संपल्याने औषध विक्रेत्यांकडून रुग्णांना थोडी फार औषधे देऊन काही दिवस थांबण्याची विनंती केली जात आहे.

गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडॉऊनमुळे सांगली जिल्ह्यातील औषधांची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. सांगली जिल्ह्यात प्रामुख्याने मुंबई, भिवंडी आणि फुरसुंगी (पुणे) येथून औषधे उपलब्ध होतात. परंतु या तिन्ही ठिकाणांहून गेल्या चौदा दिवसांत एकही गाडी सांगलीत जिल्ह्यात पोहोचलेली नाही. सांगली जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या आणि औषध व्यवसायाचा व्याप दिवसागणिक वाढतो आहे. रुग्णांच्या संख्याही नियमितपणे भरमसाट वाढते आहे.

रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मेंदूविकार, कर्करोग, मानसोपचार यासह अन्य विकारांवरील जिल्ह्यातील औषध विक्रीची उलाढाल ही कोट्यवधी रुपयांच्या पटीत आहे. गेल्या 14 दिवसांच्या लॉकडॉऊनमुळे ही सर्व उलाढाल ठप्प झाली नसली तरी दुकानांमधील औषधांचे साठे मात्र आता संपुष्टात येऊ लागले आहेत. रुग्णांना महिन्याऐवजी आठ दिवसांची औषधे देऊन औषध विक्रेते रुग्णांची गैरसोय टाळत आहेत. रुग्णही औषध विक्रेत्यांच्या विश्वासावर मिळेल तेवढी औषधे घेऊन आपले आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी तर नेहमीची औषधे बदलून डॉक्‍टर मंडळीही बाजारपेठेत उपलब्ध असलेली औषधे देऊन रुग्णांची सोय करीत आहेत.

या सगळ्या उलाढालीत गेल्या दोन दिवसांपासून मात्र सांगली जिल्ह्यातील सर्वच औषध दुकानांमधून औषधांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान या टंचाईची गंभीर दखल सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन घेऊन त्यासाठी औषध पुरवठा नियमित होण्यासाठी प्रशासकीय आणि वाहतूकदार संघटनेचे स्तरावर कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हा तिढा सुटेल आणि जिल्ह्यास औषधांचा नियमित पुरवठा सुरू होईल असा विश्वास सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे.

ब्रॅंडेड औषधांबाबत ही स्थिती असली तरी जेनेरिक औषधंबाबत मात्र नेमके उलटे चित्र आहे जेनेरिक औषधांच्या दुकानात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासह सामान्य रोगांवरील औषधे मुबलक प्रमाणात स्वस्त औषधांच्या दुकानात उपलब्ध असल्याचे संबंधित विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय डॉक्‍टरांनी कोणत्याही व्याधीवर दिलेली जेनेरिक औषधे आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही स्वस्त औषध विक्रेत्यांनी सांगितले. एकूणच सांगली जिल्ह्यातील औषध विक्रीची स्थिती ही टंचाईसदृश असली तरी जेनेरिक औषध हा त्यासाठीचा पर्याय असूनही त्याबाबत अद्यापही डॉक्‍टर आणि रुग्ण यांचा सूर जुळलेला दिसत नाही. 

वाहतूक व्यवस्था नियमित होईल 

जिल्ह्यातील औषधांची वाहतूक व्यवस्था नियमित करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मुंबई, भिवंडी आणि फुरसुंगी (पुणे) येथून बंद असलेला औषध पुरवठा दोन दिवसांत नियमितपणे सुरू होईल 

- विशाल दुर्गाडे, अध्यक्ष, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन 

स्वस्त औषध दुकानात मुबलक साठा 

करोना बाबतच्या बातम्या दिसू लागताच आम्ही जेनेरिक औषधांच्या पुरवठादार कंपन्यांकडून आणखी दोन महिने ग्राहकांना देता येतील एवढी औषधे स्वस्त औषधी दुकानांमध्ये उपलब्ध करून ठेवली आहेत. 

- श्रीपाद कोल्हटकर, जेनेरिक औषध विक्रेते, मिरज 

रुग्णांना धीर देणे एवढेच आपल्या हाती 

लॉकडॉऊनच्या कालावधीबाबत संभ्रम असल्याने रुग्णांकडून घरातील औषधांचा साठा वाढवून देऊन ठेवण्याचे प्रमाण वाढले. रुग्णांचे गैरसमज सामान्य औषध विक्रेत्यांना त्रासदायक ठरले. त्यामुळे रुग्णांची समजूत काढून त्यांना धीर देणे एवढेच सध्या सामान्य औषध विक्रेत्यांच्या हाती आहे. 

- उन्मेश वसगडेकर, औषध विक्रेता, मिरज 

सर्वांच्या सहकार्याने हा जगन्नाथाचा रथ ओढावाच लागेल 

करोनाच्या संकटाची व्याप्तीच जागतिक स्वरूपाची असल्याने आपला देशही त्यातून सुटू शकत नाही. संकटाची व्याप्ती आणि त्याचे परिणाम हे सगळेच अनाकलनीय आहे. त्यामुळे काही दिवसच नव्हे तर काही महिनेतरी या संकटाचा त्रास सर्वांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आणि औषध विक्रेतेच्या सहकार्याने रुग्णसेवेच्या जगन्नाथाचा रथ सर्वांना ओढावा लागेल. 

- डॉ विनोद परमशेट्टी, मिरज 

रुग्णांनी घाबरू नये 

रुग्ण आणि डॉक्‍टर या दोघांनी घाबरण्यासारखी सध्याची स्थिती आहे. औषधांचा साठा कमी होणेही स्वाभाविक आहे. रुग्णांनी औषधांबाबत डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध असलेल्या औषधांचा अमल करावा. आपण सर्वांनाच या गंभीर स्थितीचा घाबरून न जाता मुकाबला करावा लागेल. 

- डॉ. शशिकांत दोरकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, मिरज