आचारसंहितेपूर्वी "कोयना'त बोटिंग 

आचारसंहितेपूर्वी "कोयना'त बोटिंग 

कोयनानगर - आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे सात किलोमीटर अंतरावरून कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर अंतरावर बोटिंग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कोयना धरणात बोटिंग सुरू करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

दौलतनगर (ता. पाटण) येथे (कै.) शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी महसूल, पोलिस, कोयना प्रकल्प प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. त्यात त्यांनी कोयना धरणात लवकरात लवकर बोटिंग सुरू करण्यात येणार असून तिन्ही विभागांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला आमदार शंभूराज देसाई, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील उपस्थित होते. श्री. केसरकर म्हणाले, ""कोयना जलाशयात कोयना धरणाच्या भिंतीपासून सात अथवा दहा किलोमीटरपुढे बोटिंग चालू करावे, असा अहवाल पोलिस प्रशासनाने दिला होता. आमदार देसाईंनी धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर परिसरात बोटिंग सुरू करावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर अंतरावर बोटिंग सुरू करण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी देसाईंसमवेत कोयना परिसराची हवाई व प्रत्यक्ष पाहणी केली आहे. बोटिंगसाठी धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मानाईनगर गावाजवळ ठिकाण निश्‍चित केले आहे.'' 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी तारळे मतदान केंद्रावर शंभूराज युवा संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिस अधिकाऱ्याकडून मारहाण झाल्याप्रकरणी आठ दिवसांत निर्णय दिला जाईल. 

- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com