महाराष्ट्रदिनी अवतरतेय पहिलं 'पुस्तकांचं गाव'!

रविकांत बेलोशे
रविवार, 16 एप्रिल 2017

भिलारमध्ये पुस्तके दाखल; निवडक ठिकाणी रंगरंगोटीसह सुशोभीकरण

भिलारमध्ये पुस्तके दाखल; निवडक ठिकाणी रंगरंगोटीसह सुशोभीकरण
भिलार - स्ट्रॉबेरीची पंढरी असणारे भिलार गाव ज्ञानपंढरी म्हणून नावारूपाला आणण्यासाठी राज्यातील अनेक कलाकारांचे हात सरसावले आहेत. राज्यातील किंबहूना देशातील पहिलं "पुस्तकांचं गाव' म्हणून भिलार आकार घेऊ लागलंय. गावात पुस्तके दाखल झाली असून, निवडक 25 ठिकाणांची रंगरगोटी, तसेच सुशोभीकरणासाठी कलाकारांचे हात गतिमान झालेत. घोषणा झाल्यानंतर आता "पुस्तकांचं गाव' प्रत्यक्षात साकार करण्यासाठी गावकरीही आघाडीवर आहेत.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून भिलार हे "पुस्तकांचं गाव' म्हणून नावारूपाला येणार आहे. महाराष्ट्रदिनी एक मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन होणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाच्या सूत्रांनी दिली.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी 27 मे 2014 रोजी याबाबत घोषणा करण्यात आली. एक मे रोजी भिलार हे गाव "पुस्तकांचं गाव' म्हणून प्रत्यक्षात साकारणार आहे. त्यात गावकऱ्यांचा सहभाग लक्षणीय ठरणार आहे. गावातील शाळा, मंदिरे, कृषी पर्यटन निवासे, घरे अशी 25 ठिकाणे निवडण्यात आली असून, याठिकाणी सध्या रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. पुस्तकांसाठी कपाटे, त्यांची मांडणी अशा अंतर्गत सजावटीच्या कामानेही गती घेतली आहे. ही 25 ठिकाणे सजविण्यासाठी ठाणे, पुणे, मुंबई, वाई, सातारा येथील कलावंतांसह राज्यस्तरावरील कलाकार विनामोबदला सहभागी झालेत.
ग्रामस्थांनी आपली घरे, हॉटेल्सच्या खोल्या स्वयंस्फूर्तीने या संकल्पनेसाठी विनामोबदला दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील पुस्तकांची खरेदी झाली असून, त्यामध्ये "झोंबी', "ज्ञानेश्‍वरी', शिवचरित्रे, गडकिल्ले इतिहास, महाराष्ट्राची चळवळ, प्राचीन इतिहास, पर्यटन, आत्मचरित्रे अशी विविध विषयांची पुस्तके भिलारमध्ये दाखल झाली आहेत. त्यांचे वर्गीकरण केले जात आहे. त्यासाठी स्थानिक युवक, शिक्षकांची मदत घेतली जात आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, बालसाहित्य, पर्यावरण, संत साहित्य, आत्मचरित्र असे विविध गट करून 25 ठिकाणांवर एका प्रकारचे साहित्य ठेवले जाणार आहे.

त्यामुळे घरांचे वाचनालयात व गावाचे ग्रंथालयात रूपांतर होईल. त्यातून वाचन संस्कृतीला वाचवण्याचे काम होणार आहे. यानिमित्ताने स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध भिलार आता "पुस्तकांचं गाव' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशात प्रसिद्धीस येईल. भिलारला पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता साहित्यिक पर्यटकही या गावाकडे वळतील. विविध शाळांच्या सहलींमुळेही या गावाला वर्दळ वाढून गावाचे ज्ञानपंढरीत रूपांतर होईल.

ग्रामस्थांचे योगदान वाखणण्याजोगे
विनय मावळणकर (मराठी भाषा विभाग विषयतज्ज्ञ) - पुस्तकांचे गाव म्हणून भिलारची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल. ग्रामस्थांनीही दिलेला सहभाग वाखाणण्याजोगा आहे. शासनातर्फे विविध नामवंत लेखकांच्या कार्यशाळाही याठिकाणी होतील. या सर्व नियोजनासाठी वाईच्या विश्‍वकोश मंडळाचे सदस्य सहकार्य करीत आहेत.

प्रत्येक घर वाचनालय करू
वंदना भिलारे (सरपंच, भिलार) : पुस्तकांचे गाव म्हणून भिलारला आता वेगळा नावलौकिक प्राप्त होईल. त्यामुळे आमचं गावं आम्ही ग्रंथालयाच्या रूपांतरासाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येक घर वाचनालय करण्यासाठी प्रयत्न आहे. या संकल्पनेला प्रथमपासूनच मदतीचा हात दिला असून, यापुढेही त्यासाठी झटत राहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: book village at maharashtra day