सीमाप्रश्‍न सुटावा, हीच श्रद्धांजली! हुतात्म्यांच्या वारसांची अपेक्षा

मिलिंद देसाई
Sunday, 17 January 2021

तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाला मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत.

बेळगाव : सीमालढ्यात मराठी भाषिकांसह इतर भाषिकांनीही योगदान दिले आहे. १७ जून १९५६ रोजी झालेल्या आंदोलनावेळी झालेल्या गोळीबारात महादेव बारागडी धारातिर्थी पडले. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाला मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. बारागडी यांची मुलगी जमखंडीत वास्तव्यास असून, त्यांची महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सातत्याने विचारणा केली जाते.

संयुक्‍त महाराष्ट्रासाठी सीमाभागात ज्या पहिल्या पाच हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यामध्ये महादेव बारागडी यांचा समावेश आहे. किर्लोस्कर रोड येथे झालेल्या आंदोलनावेळी बारागडी हे पोलिस गोळीबारात हुतात्मा झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व मुलगी होती. बारागडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. काही वर्षांनंतर त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. त्यानंतर मुलगी गंगव्वा या विविध प्रकारची कामे करून आपला संसाराचा गाडा चालविला.

हेही वाचा -  हजारो कार्यकर्त्यांना उद्देशून आज त्यांचे भाषण होणार आहे

अनेक वर्षे गुड्‌सशेड रोड येथे राहिल्यानंतर त्यांची मुलगी गंगव्वा सध्या जमखंडी येथे वास्तव्यास असून, त्यांच्यासमवेत त्यांची नात राहते. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगीने म. ए. समिती नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार समितीतर्फे अनेकदा त्यांना मदत केली आहे.
गंगव्वा यांना मराठी बोलता येते, मात्र त्यांच्या कुटुंबातील इतर लोक कन्नड भाषिक असल्याने बारागडी यांच्या कुटुंबातील इतर लोकांना सीमाप्रश्‍नाबाबत अधिक माहिती नाही.

मात्र, संयुक्‍त महाराष्ट्राचा लढा कशासाठी निर्माण झाला आणि त्यावेळी कशाप्रकारे गोळीबार झाला, याबाबतची माहिती त्यांना आहे. दरवर्षी हुतात्मादिनी महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेतर्फे त्यांचा साडी चोळी देऊन सन्मान केला जातो. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सातत्याने पाठपुरावा करून गंगव्वा यांना पेन्शन मिळवून दिली आहे. आता सीमाप्रश्‍न सुटावा, हीच गंगव्वा यांची इच्छा आहे.

हेही वाचा - कुडची व माजी मंत्री शशिकांत नाईक यांना विमानतळावर प्रवेश देण्यात आला नाही 
 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: border disputes of belgaum and karnataka special identity of heritage on martyrs day in belgaum