साताऱ्यातील दोन्ही आमदार म्हणतात, आम्ही शरद पवारांसोबत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आपण असल्याची माहिती वाई आणि कराड उत्तरचे आमदार यांनी नमूद केले आहे.
 

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आपण असल्याची माहिती वाई आणि कराड उत्तरचे आमदार यांनी नमूद केले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई येथे बोलावलेल्या बैठकीसाठी आपण जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सकाळशी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे निश्चित झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. यात कराड उत्तरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेलाही विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार की उपमुख्यमंत्री अजित पवार यापैकी कोणाच्या पाठीशी राहणार ? या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 त्याबाबत आमदार पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबई येथे सायंकाळी बोलावलेल्या बैठकीसाठी निघालो असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. त्यावरून आमदार पाटील ज्येष्ठ नेते पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 25 नोव्हेंबरला कराड शहरात तसेच यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर ज्येष्ठ नेते पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी आमदार पाटील येथे थांबून होते. मात्र निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे व पक्षाध्यक्ष श्री. पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमुळे आमदार पाटील आज तातडीने मुंबईला रवाना झाले. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा ज्येष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांनी जोपासला आहे.  तोच वारसा व परंपरा आमदार पाटील सांभाळत आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे शरद पवार हे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यशवंत विचारांची पाठराखण करणारे आमदार पाटील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतच राहतील असे दिसून येते.

वाईचे आमदार मकरंद पाटील यांनीहि आपण पवार साहेबांसोबत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. चव्हाण हे विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both Satyar MLAs say, We are with Sharad Pawar